गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी थरारक खेळ झालेल्या लढतीत एससी ईस्ट बंगाल आणि चेन्नईयन एफसी यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली. दुसऱ्या सत्रात नऊ मिनिटांच्या अंतराने तीन गोल झाले. त्यातील दोन गोल करीत ईस्ट बंगालने एक गुण कमावला, पण त्यांची विजयाची प्रतिक्षा लांबली. मॅट्टी स्टेनमन याने ईस्ट बंगालला तारले. त्यानेच दोन्ही गोल केले.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. चेन्नईयनचे खाते 13व्या मिनिटाला मध्य फळीतील मिझोरामचा 23 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू लालियनझुला छांगटे याने उघडले. या प्रतिभाशाली खेळाडूने मोसमात प्रथमच स्कोअरशीटवर आपले नाव नोंदवले. मध्यंतरास चेन्नईयनने ही आघाडी राखली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 59व्या मिनिटाला मध्य फळीतील जर्मनीचा 25 वर्षीय खेळाडू मॅट्टी स्टेनमन याने ईस्ट बंगालला बरोबरी साधून दिली. चेन्नईयनला चार मिनिटांत पश्चिम बंगालचा युवा खेळाडू रहीम अली याने आघाडी मिळवून दिली. आघाडी फळीतील या 20 वर्षीय खेळाडूने 64व्या मिनिटाला गोल केला. चेन्नईयनची आघाडी चार मिनिटे टिकली. स्टेनमन याने वैयक्तिक तसेच ईस्ट बंगालचा दुसरा गोल 68व्या मिनिटाला केला. ही कोंडी कायम राहिली.
चेन्नईयनने सात सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून दोन विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 9 गुण झाले. त्यांनी सरस गोलफरकामुळे हैदराबादला मागे टाकत सातवे स्थान मिळवले. हैदराबादचे सहा सामन्यांतून 9 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक शून्य असा समान आहे. पण हैदराबादचे सहा, तर चेन्नईयीनचे सात गोल आहेत. एक गोल जास्त असल्यामुळे चेन्नईयनला सातवा क्रमांक मिळाला.
ईस्ट बंगालने सात सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून त्यांना चार पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांनी तीन गुणांसह शेवटच्या 11व्या स्थानावरून एक क्रमांक उंचावला. आता ओदिशा सात सामन्यांतून दोन गुणांसह तळात आहे.
मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचेही सात सामन्यांतून 16 गुण आहेत. यात मुंबईचा 8 (11-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) गोलफरकापेक्षा तीनने सरस आहे. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी व एफसी गोवा यांची 8 सामन्यांतून 11 गुण अशी समान कामगिरी आहे. यात नॉर्थईस्टता 2 (10-8) गोलफरक गोव्याच्या 1 (10-9) गोलफरकापेक्षा सरस आहे. त्यामुळे नॉर्थईस्ट चौथ्या स्थानावर आहे.
खाते उघडण्याची शर्यत चेन्नईयनने जिंकली. आघाडी फळीतील जेकब सिल्व्हेस्टर याला मध्य रेषेपाशी चेंडू मिळाला. त्याने वेगवान हालचाली करीत छांगटे याच्यासाठी संधी निर्माण केली. छांगटेने उत्तम साथ देत सुमारे 40 यार्ड अंतर वेगाने पार केले. छांगटेने गोलक्षेत्रात प्रवेश करताच ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार पुढे सरसावला. छांगटे नेटच्या दिशेने मारणाऱ्या शॉटचा कोन कमी व्हावा आणि तो चकावा या उद्देशाने मजुमदारने झेप टाकली. छांगटेने मजुमदारच्या हालचालींचा नीट अंदाज घेत त्याच्या खालून चेंडू मारत नेटमध्ये घालवला.
ईस्ट बंगालच्या मध्य फळीतील बिकाश जैरू याने कॉर्नर कीकवर मारलेल्या चेंडूवर स्टेनमन याने हेडिंग केले. क्रॉसबारला लागून आलेला चेंडू नेटमध्ये गेला तेव्हा चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याला काहीही करता आले नाही. स्टेनमनला मार्किंग करण्यात चेन्नईयनकडून चुका झाल्या. स्टेनमन हा ईस्ट बंगालकडून गोल केलेला दुसराच खेळाडू ठरला.
रहीमने चेन्नईयनला आघाडी मिळवून दिली. त्याने उजवीकडून आगेकूच करीत मध्य फळीतील रॅफेल क्रिव्हेलारोला पास दिला. त्यातून गोलक्षेत्रालगत आघाडी फळीतील जेकब सिल्व्हेस्टर याला चेंडू मिळाला. तोपर्यंत घोडदौड सुरु ठेवलेल्या रहीमने गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्याने प्रतिस्पर्धी जैरूला हुलकावणी देत चेंडू नेटमध्ये घालवला.
ईस्ट बंगालकडून मग स्टेनमन यानेच लक्ष्य साधले. जैरूने घेतलेल्या कॉर्नर कीकवर डॅनिएल फॉक्सने हेडिंग केले. विशाल कैथने खाली वाकून चेंडू थोपवला, पण तो थेट स्टेनमनच्या पायापाशी गेला. स्टेनमनने मग सफाईदार फिनिशींग केले.
दुसऱ्या मिनिटाला ईस्ट बंगालला उजवीकडे मिळालेला कॉर्नर मध्य फळीतील अँथनी पिल्कींग्टन याने गेतला, पण प्रतिस्पर्ध्याने तो हेडिंगद्वारे बाहेर घालवला. चौथ्या मिनिटाला चेन्नईयनने आगेकूच केली. मध्य फळीतील रॅफेल क्रिव्हेलारोने सिल्व्हेस्टरला पास दिला. त्याचवेळी मजुमदार पुढे सरसावला आणि चेंडूपाशी आधी जात त्याने ही चाल फोल ठरवली.
दहाव्या मिनिटाला पिल्कींग्टनने चेन्नईयनचा बचावपटू इनेस सिपोविच याच्या आव्हानाला दाद लागू न देता कॉर्नर मिळवला. त्याने उजव्या पायाने गोलक्षेत्रात मारलेला फटका चेन्नईयीनने रोखला. 18व्या मिनिटाला क्रिव्हेलारोने दिलेल्या पासवर छांगटेने डावीकडून प्रयत्न केला, पण ईस्ट बंगालच्या बचाव फळीतील स्कॉट नेव्हीलने चेंडू दूर घालवला.
पुढे 37व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या मध्य फळीतील महंमद रफिक याने आगेकूच करीत चेन्नईयनच्या गोलक्षेत्रात प्रवेश केला. चेंडूसह स्थिरावून अंदाज घेत शॉट मारण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी बचावपटू दिपक टांग्री याने त्याला रोखले.
त्यानंतर 42व्या मिनिटाला आघाडी फळीतील रहीम अली याला सिल्व्हेस्टरने डावीकडे पास दिला. त्यातून उजवीकडील क्रिव्हेलारोला संधी मिळाली. क्रिव्हेलारोने पुन्हा रहीमच्या दिशेने चेंडू मारला. रहीमने छांगटेच्या दिशेने चेंडू मारला, पण या चालीचे फिनिशिंग होऊ शकले नाही.
पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत सिल्व्हेस्टरने उजवीकडे छांगटेला पास दिला. त्याचवेळी मजुमदार पुढे सरसावल्यामुळे छांगटेला प्रयत्न करणे शक्य झाले नाही. त्याने चेंडू मागे मारला, पण त्याचा एकही सहकारी योग्य ठिकाणी नव्हता.