भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला २६ डिसेंबरला मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९५ धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात वरचढ होण्याची नामी संधी चालून आली आहे.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचविण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विननेही मोलाचा वाट उचलला. त्याने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. खरेतर ऑस्ट्रेलियन भूमीवर फिरकी गोलंदाजाना यश मिळविणे तितकेसे सोपे नसते. मात्र अश्विनने आपल्या वैविध्यासह ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कोड्यात टाकले.
या तीन बळींसह त्याच्या नावे एक खास कामगिरी देखील नोंदवली गेली. ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक वेळा ३ किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला. या कामगिरीसह त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले. याच निमित्ताने या लेखात आपण अशा तीन फिरकीपटूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेळा ३ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
३) बिशनसिंग बेदी-
माजी डावखुरे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी हे भारताचे ७०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानले जातात. चेंडूला हवेत उंची देऊन फलंदाजांना फसविणे, ही त्यांची खासियत होती. बेदींनी ऑस्ट्रेलियात ७ कसोटी सामन्यात ३५ बळी पटकविले आहेत. यात एकूण ६ वेळा त्यांनी ३ किवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा कारनामा केला.
२) अनिल कुंबळे-
कर्नाटकचा लेगस्पिनर अनिल कुंबळे भारताचा आकड्यांच्या दृष्टीने सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत त्याने तब्बल ६१९ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या जागतिक यादीतही तो तिसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेने ऑस्ट्रेलियन भूमीवर १० कसोटी सामन्यात ४९ बळी घेतले आहेत. यात एकूण ७ वेळा त्याने ३ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
३) आर अश्विन-
तामिळनाडूचा ऑफस्पिनर आर अश्विन सध्याच्या भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. अश्विनला परदेशी खेळपट्ट्यांवर फारसे यश मिळत नाही, असे मानले जाते. मात्र ऑस्ट्रेलियन भूमीवरील त्याचे आकडे वेगळीच कहाणी सांगतात. ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ९ सामन्यात अश्विनने ३५ गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे तब्बल ८ वेळा त्याने ३ किंवा त्याहून अधिक बळी पटकाविले आहेत. त्यामुळे या यादीत अश्विन अव्वल क्रमांकावर आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन सामने अजून बाकी असल्याने या आकड्यांमध्ये अजून सुधारणा करण्याची संधीही त्याच्याकडे आहे.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– पहिल्या दिवसाच्या कामगिरीनंतर दिग्गज भारतीय संघावर खुश, ट्विट करत केले कौतुक
– व्हिडिओ: कैसे लगा उस्ताद? फिल्डिंग कोच श्रीधरनी पदार्पणवीर सिराजची घेतली खास हैद्राबादी ढंगात मुलाखत