गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील पहिल्या लेगमधील शेवटच्या टप्प्यात बुधवारच्या (२९ डिसेंबर) एफसी गोवा आणि एटीके मोहन बागान यांच्यातील लढतीद्वारे मोहन बागानचे नवनियुक्त प्रशिक्षक हुआन फेरँडो केंद्रस्थानी असतील.
फेरँडो यांनी एफसी गोवाचा निरोप घेताना एटीकेची सूत्रे स्वीकारली. सांघिक कामगिरी ढेपाळल्यानंतर क्लब मालकासोबत बेबनाव झाल्यानंतर आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी याच महिन्यात राजीनामा दिला. त्या जागी फेरँडो आले. त्यांचा पायगुण चांगला ठरला. मागील सामन्यात एटीके मोहन बागानने नॉर्थ ईस्ट युनायटेडवर चुरशीच्या लढतीत ३-२ अशी मात केली. एफसी गोवाची बलस्थाने आणि कमकुवत बाबी ठाऊक असल्याने बुधवारच्या लढतीत मोहन बागानने सातत्य राखावे, यासाठी स्पेनवासी हुआन फेरँडो उत्सुक आहेत.
हुआन फेरँडो यांच्यानंतर गोव्याचे प्रशिक्षकपद सांभाळणारे डेरिक परीरा हे खेळाडूंवर मेहनत घेत आहेत. माजी प्रशिक्षकांपेक्षा त्यांच्या कार्यकाळात सांघिक खेळ उंचावण्यासह एफसी गोवा विजयी मार्गावर परतण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या तीन पराभवांनंतर फेरँडो यांच्या प्रशिक्षकपदाखालील गोव्याने सलग दोन विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. मात्र, मागील दोन लढतींमध्ये अनुक्रमे हैदराबाद आणि ओदिशा एफसीविरुद्ध १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. ७ सामन्यांतून ८ गुणांसह एफसी गोवा आठव्या हंगामातील गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. मात्र, एखादा विजय त्यांना अव्वल पाच संघांजवळ पोहोचवू शकतो. एटीके मोहन बागानचे ७ सामन्यांतून ११ गुण झाले असून पॉइंट्स टेबलमध्ये ते पाचव्या स्थानी आहेत. मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेडवर विजय मिळवत मोहन बागानने दोन सामन्यांची बरोबरीची मालिका खंडित केली.
एफसी गोवासाठी आनंदाची बाब म्हणजे जॉर्ज ऑर्टिझ हा मोहन बागानविरुद्ध निवडीसाठी उपलब्ध आहे. निलंबनामुळे तो सामन्यांत खेळू शकला नव्हता. आठव्या हंगामात ५ सामने खेळताना ऑर्टिझने एक गोल करताना तीन गोल करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, अयरॅम कॅब्रेराची अनुपस्थिती गोव्याला जाणवेल. स्नायू दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामाला मुकला आहे.
यापुढेही आमची फिलॉसॉफी बदलणार नाही. काही सामन्यांत आमचा खेळ ढेपाळला. मात्र, संपूर्ण ९० मिनिटे चांगला खेळ करण्यावर आमचा फोकस असतो. संघ म्हणून आमच्यात सुधारणा आहे. त्यामुळे उर्वरित लीगमध्ये चांगला निकाल अपेक्षित आहे, असे डेरिक परीरा यांनी एटीके मोहन बागानविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
डेशॉर्न ब्राउनची हॅटट्रिक; नॉर्थ ईस्ट-मुंबई सिटी एफसी लढत ३-३ बरोबरीत
आयएसएल २०२१-२२: हैदराबादला रोखण्यास ओदिशा उत्सुक
Video: चालू सामन्यात फुटबॉलपटूचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, संघ सहकाऱ्यांचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे