बॉर्डर- गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात रिषभ पंतने अविश्वसनीय खेळी केली होती. यामुळे भारतीय संघाने २-१ ने ती मालिका जिंकली होती. त्यावेळी पंतच्या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले होते. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इग्लंडच्या पहिल्या कसोटीत सामन्याच्या पहिल्या डावात पंतने इंग्लंडच्या जॅक लीचच्या चेंडूना जोरदार प्रत्युत्तर देत आकर्षक खेळी केली होती. त्यामुळे लीचचा आत्मविश्वास डगमगला होता. याविषयी आता त्याने वक्तव्य केले आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात पंतने ८८ चेंडूत ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या होत्या. यादरम्यान लीचच्या एका षटकात त्याने सलग २ षटकार मारले होते. एवढेच नव्हे तर, त्याने ४० चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली होती.
लीचने पंतच्या खेळीबद्दल बोलताना स्काय स्पोर्ट्सला म्हटले की, “हा माझा पहिला भारत दौरा आहे आणि आमची सुरुवात देखील खूप जोरदार होती. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आला. याच गोष्टींमुळे मला क्रिकेट खेळायला खूप आवडते.”
“चेन्नई कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ८ षटके गोलंदाजी करताना मी ७७ धावा दिल्या. यादरम्यान पंतने माझ्या गोलंदाजीवर मोठमोठे शॉट मारले. त्याने माझी धुलाई केलेले पाहून मी हताश होऊन भविष्यात क्रिकेट न खेळण्याचा विचार केला होता. परंतु अखेरच्या दिवशी मोठमोठ्या विकेट्स चटकावत मी सामन्यात दमदार पुनरागमन केले. याबरोबरच संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला, याचा मला अभिमान आहे,” असे त्याने पुढे म्हटले.
या सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात लीचने सलामीवीर रोहित शर्माला अवघ्या १२ धावांवर त्रिफळाचीत केले होते. याविषयी बोलताना लीचने सांगितले की, “सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मासारख्या फलंदाजाला माझ्या चेंडूवर ज्याप्रमाणे बाद केले, ते मला खूपच आवडले. याच शैलीचा वापर मी आगामी सामन्यात देखील करेन.”
रिषभ पंत याने आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १७ कसोटी सामने खेळले आहेत त्यात त्याने ११९० धावा काढल्या होत्या, तर एकदिवसीय सामन्यात १६ सामने खेळून ३७४ इतक्या धावा त्याच्या नावावर आहेत. टी२० कारकिर्दीत एकूण २७ सामने खेळले असून ४१० धावा त्याच्या नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, अंडरसनसह ‘हे’ खेळाडू बाहेर
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र
IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे ‘हे’ ७ खेळाडू बसणार बाकावर?