ऍरॉन फिंच याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ युएई येथे टी२० विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. विश्वचषकाच्या समाप्तीनंतर लगेच ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध मायदेशात प्रतिष्ठित ऍशेस मालिका खेळणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या जेम्स पॅटिन्सन याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
या कारणाने घेतली निवृत्ती
आगामी ऍशेस मालिकेची ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड तयारी करत असताना त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३१ वर्षीय पॅटिन्सनने सततच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले. पॅटिन्सन कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच नेहमी दुखापतग्रस्त राहिला आहे. तो अॉस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख सदस्य होता. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड व पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांसोबत मिळून त्याने ऑस्ट्रेलियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले होते.
माझे स्वप्न पूर्ण झाले
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्याने म्हटले,
“मी मोठा होत असताना सतत ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याचे व चांगली कामगिरी करण्याचे स्वप्न पाहत आलो होतो. मी माझे पूर्ण लक्ष ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट क्रिकेट खेळण्यावर दिले. आता एका टप्प्यावर ते पूर्ण झाले आहे.”
पॅटिन्सन निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागेवर तितकाच प्रतिभावंत वेगवान गोलंदाज शोधण्याचे आव्हान ऍशेसपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे असेल.
अशी राहिली कारकीर्द
जेम्स पॅटिन्सन याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा न्यूझीलंड विरुद्ध २०११ मध्ये केला होता. पहिल्याच सामन्यात त्याने पाच बळी मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने तो बराच काळ मैदानाबाहेर राहीला. त्याने आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत केवळ २१ कसोटी खेळताना ८१ बळी मिळवले. तसेच त्याने १५ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील वर्षी आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला आयपीएल विजेते बनवण्यात त्याचा हातभार होता.