गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची अपराजित मालिका संपुष्टात आली. जमशेदपूर एफसीने वास्को येथील टिळक मैदानावर नॉर्थईस्टला 1-0 असे हरवले. महाराष्ट्राचा युवा स्ट्रायकर अनिकेत जाधव याने दुसऱ्या सत्रात केलेला गोल निर्णायक ठरला. त्याचवेळी नॉर्थईस्टला इद्रीस स्यीलाने पेनल्टी दवडल्याचा फटका बसला.
नॉर्थईस्टला सात सामन्यांत पहिलाच पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण व चौथे स्थान कायम राहिले. जमशेदपूरने सात सामन्यांत दुसरा विजय मिळवला असून चार बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले. त्यांनी दोन क्रमांक प्रगती करीत सातवरून पाचवा क्रमांक गाठला. जमशेदपूरचा गोलफरक 1 (8-7) नॉर्थईस्टपेक्षा 2 (8-6) कमी आहे. त्यामुळे नॉर्थईस्टचे चौथे स्थान कायम राहिले. दोन्ही संघांनी केलेले गोल आठ असे समान आहेत.
मुंबई सिटी एफसी सहा सामन्यांतून 13 गुणांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचे सहा सामन्यांतून 13 गुण आहेत. यात मुंबई सिटीचा गोलफरक 6 (9-3) एटीकेएमबीपेक्षा 4 (7-3) सरस आहे. त्यामुळे मुंबई सिटी आघाडीवर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील बेंगळुरू एफसीचे 6 सामन्यांतून 12 गुण आहेत. हिरो आयएसएलच्या यंदाच्या मोसमात आता केवळ बेंगळुरू एफसी आणि हैदराबाद एफसी हे दोनच संघ अपराजित आहेत.
खाते उघडण्याची शर्यत जमशेदपूरने जिंकली. मध्य फळीतील खेळाडू जॅकीचंद सिंग या चालीचा शिल्पकार ठरला. 20 वर्षीय अनिकेतचा पास गोलक्षेत्रालगत मिळवत त्याने आगेकूच केली. डाव्या बाजूला असलेला मध्य फळीतील सहकारी इसाक वनमाल्साव्मा याच्याकडे त्याने चेंडू सोपवला. त्यानंतर इसाकने पुन्हा जॅकीचंदला पास दिला. तोपर्यंत अनिकेतला मार्किंग नसल्याचे जॅकीचंदने हेरले होते. त्यामुळे अनिकेतला पास देण्याची हुशारी त्याने दाखवली. मग अनिकेतने नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक गुरमीत याला चकवत गोल केला.
65व्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू स्टीफन इझे याने चेंडूवर ताबा मिळविण्याच्या चुरशीत नॉर्थईस्टचा बचावपटू बेंजामीन लँबोट याला पाडले. त्यामुळे नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल करण्यात आली. रेफरी ए. रोवन यांनी हा इशारा करताच गिनीचा 30 वर्षीय स्ट्रायकर इद्रीस स्यीला पुढे सरसावला. त्याने मारलेला चेंडू जमशेदपूरला गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने डावीकडे झेप टाकत अडवला.
चौथ्या मिनिटाला जमशेदपूरचा हुकमी स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीसने आगेकूच केली, पण नॉर्थईस्टचा बचावपटू बेंजामीन लँबोट याने मैदानावर घसरत त्याला पाडले. यातून जमशेदपूरला फ्री किक मिळाली. इसाकने बचाव फळीतील स्टीफन इझे याच्याकडे चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची किक स्वैर होती.
अकराव्या मिनिटाला अनिकेतने बचाव फळीतील सहकारी पीटर हार्टली याच्याकडे पास देताना ढिलाई दाखवली. त्यामुळे नॉर्थईस्टचा स्ट्रायकर क्वेसी अप्पीया याने चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी धाव घेतली, पण हार्टलीने लगेच सावरत चपळाईने जास्त वेग राखला आणि मैदानावर घसरत चेंडूवर नियंत्रण मिळवले. 30व्या मिनिटाा इसाकने डावीकडून मुसंडी मारली. त्याने गोलक्षेत्रात मैदानालगत मारलेला क्रॉस शॉट जॅकिचंदने डावीकडे मिळवला. जॅकीचंद प्रयत्न करणार तोच लँबोटने चेंडू बाहेर घालवला. पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत इसाकने डावीकडून आगेकूच केली, पण नॉर्थईस्टचा बचावपटू गुरजिंदर कुमारने त्याला रोखले.
69व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा बदली स्ट्रायकर लुईस मॅचादो याने फ्रि किक घेताना चेंडू अकारण उंच मारला. त्यामुळे ही संधी वाया गेली. दोन मिनिटांनी वॅल्सकीसने हेंडिंगवर अनिकेतकडे चेंडू सोपवला, पण लँबोटने वेळीच बचाव केला. सात मिनिटे बाकी असताना जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने नॉर्थईस्टचा मध्यरक्षक लालेंगमाविया याला चकवून चेंडूवर ताबा मिळवला, मात्र नॉर्थईस्टचा बचावपटू डायलन फॉक्स याने त्याला रोखले.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: ओडिशाला २-१ ने पराभूत करत बेंगळुरूची आगेकूच; मिळवला सलग दुसरा विजय
– आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानचा एफसी गोवाला शह
– आयएसएल २०२०: ईस्ट बंगालला धक्का देत हैदराबाद अपराजित