भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले ४ सामने झाले असून भारतीय संघाने उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेदरम्यान भारताच्या दमदार कामगिरीबरोबरच कोणाची चर्चा झाली असेल तर ती भारतीय क्रिकेटचा चाहता असल्याचे भासवणाऱ्या आणि सातत्याने मैदानात घुसणाऱ्या जार्वोची.
काही दिवसांपूर्वी जार्वोला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. आता तो सुटल्याची चर्चा असून एका सोशल मीडियावरील पोस्टचीही चर्चा होत आहे. ज्या अकाउंटवरुन ट्विट करण्यात आले आहे, ते अकाउंट अधिकृतपणे जार्वोचेच आहे की नाही याबद्दल अजून पुष्टी झालेली नाही.
मात्र, @BMWjarvo नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरुन ५ सप्टेंबरला ट्विट करण्यात आले आहे की ‘मी आता स्वतंत्र व्यक्ती आहे. मी पुढे काय करु?’ या ट्विटनंतर आता जार्वो मँचेस्टर येथे होणाऱ्या अखेरच्या सामन्यातही दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सध्यातरी हे अकाउंट जार्वोचेच असल्याचे म्हटले जात आहे. कारण, या अकाउंटवरुन त्याच्या बऱ्याच पोस्ट करण्यात आल्या आहेत.
I am a Free Man!!!! #jarvo69 What shall I do next??? pic.twitter.com/IN00rhYaL5
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) September 4, 2021
जार्वोला ३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. तो त्यादिवशी इंग्लंड-भारत यांच्यातील चौथा सामना ओव्हल स्टेडियमवर चालू असताना मैदानात घुसला होता. या घटनेनंतर लंडन पोलिसांनी जार्वोला ताब्यात घेतले होते.
सलग तिसऱ्यांदा जर्वोची मैदानात घुसखोरी
ओव्हल कसोटीदरम्यान इंग्लंडच्या पहिल्या डावात ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना ३४ व्या षटकावेळी जार्वो अचानक मैदानात आला होता. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत उमेश यादव होता, त्याचवेळी त्याला मागून ६९ क्रमांकाची भारताची जर्सी घातलेला जार्वो येताना दिसला.
जार्वो यावेळी जोरात धावत आला आणि गोलंदाजी करण्याची कृती करु लागला. त्यावेळी तो नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या बेअरस्टोला देखील जोरात जाऊन धडकला. बेअरस्टोला याबाबत कसलीच कल्पना नसल्याने तो या धक्क्याने चकीत झाला. या घटनेमुळे काहीवेळ सामना थांबला होता.
जार्वो हा यापूर्वी लॉर्ड्स आणि हेडिंग्ले कसोटीतही मैदानात घुसला होता. लॉर्ड्स कसोटी दरम्यान तो क्षेत्ररक्षण करण्याच्या हेतूने, तर हेडिंग्ले कसोटी दरम्यान बॅट घेऊन मैदानात उतरला होता.
ओव्हल कसोटीदरम्यान तिसऱ्यांदा जार्वो मैदानात घुसल्यानंतर मात्र, इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अनेकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
आता इंग्लंड विरुद्ध भारत संघातील अखेरचा सामना १० ते १४ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीमुळे कसे बदलले आयुष्य, शार्दुल ठाकूरने केला खुलासा
ओव्हल कसोटीनंतर भारतीय खेळाडूंची झाली कोरोना चाचणी, जाणून घ्या काय आला रिपोर्ट
‘जार्वो’ पुन्हा चर्चेत, भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मानले आभार; पण काय आहे कारण?