भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे चालू असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना शेवटच्या टप्प्यावर आहे. आज (२३ जून) या सामन्याचा राखीव दिवस असून भारताने २ बाद ६४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. परंतु प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि अवघ्या १७० धावांवर संघ सर्वबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ १३९ धावांचे आव्हान मिळाले आहे. दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर नकोशी नामुष्की ओढावली आहे.
भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर बुमराह अकराव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे त्याने कसेबसे ४ चेंडू खेळले. पण दरम्यान त्याला एकही धाव घेता आली नाही. अखेर टॉम लॅथमच्या मदतीने टीम साउदीने त्याला झेलबाद केले. यासह कोणत्याही क्रिकेटपटूला नको वाटावा असा विक्रम बुमराहच्या नावावर झाला आहे.
तो कसोटीत भोपळाही न फोडता बाद होणारा १००० वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तत्पुर्वी तो कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणारा ९९९वा क्रिकेटपटूही ठरला होता. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील भारताच्या पहिल्या डावातही कायल जेमिसनने त्याला शून्यावर पायचित केले होते.
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा शून्यावर होणारे क्रिकेटपटू, जहांगिर खान हे होते. ते १९३२ मध्ये एकही धाव न करता पव्हेलियनला परतले होते.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही सर्वाधिक वेळा शून्यावर झालाय बाद
याखेरीज बुमराह आयसीसीद्वारे आयोजित पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक ६ वेळा खाते न उघडता मैदानाबाहेर पडला आहे. त्याच्यानंतर कुशल मेंडिस, शाहिन आफ्रिदी, शान मसूद, केशव महाराज, पॅट कमिन्स, शॅनन गॅब्रियल, एन्रिच नॉर्किए हे ५ वेळा बाद होत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या नवव्या क्रमांकावरील फलंदाजाचे भारताविरुद्ध ‘विक्रमी’ षटकार, रोहितलाही टाकलं मागे
व्हिडिओ: जिगरबाज बीजे वॅटलिंग! जबर दुखापत होऊनही सोडले नाही मैदान






