---Advertisement---

याचि देही याचि डोळा! द्रविड-श्रीनाथने तिसऱ्यांदा अनुभवला ‘परफेक्ट टेन’चा थरार

On: शनिवार, डिसेंबर 4, 2021 4:28 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिल्या डावात ११० षटकांमध्ये सर्व गडी गमावत भारताने ३२५ धावा जमवल्या. भारताच्या या डावात लक्ष वेधले ते न्यूझीलंडच्या फिरकीपटू एजाज पटेल याने. त्याने भारताच्या सर्वच्या सर्व १० फलंदाजांना बाद करत इतिहास तर रचलाच सोबतच अविश्वसनीय कामगिरीही केली आहे. त्याचवेळी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनीदेखील अशी कामगिरी ‘याची देही याची डोळा’ तब्बल तिसऱ्यांदा पाहिली.

एजाजने रचला इतिहास
जन्माने मुंबईकर असलेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारा एजाज पटेल मुंबई कसोटीचा हिरो बनला. त्याने चक्क भारताचे सर्व १० गडी बाद करण्याची कामगिरी करून दाखवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी यापूर्वी इंग्लंडचे दिग्गज जिम लेकर व भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी करून दाखवली होती. आता या क्लबमध्ये पटेलचाही समावेश झाला आहे.

द्रविड श्रीनाथ ठरले साक्षीदार
एकाच डावात एका गोलंदाजाने दहा बळी मिळवण्याची किमया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्यांदा झाली असली तरी, भारतात देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी यापूर्वी झाली होती. माजी भारतीय वेगवान गोलंदाज देवशिष मोहंती यांनी २००१ मध्ये पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग या दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात दक्षिण विभागाचे सर्व फलंदाज बाद केले होते. त्या वेळी राहुल द्रविड व जवागल श्रीनाथ दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करत होते. मोहंती यांच्या गोलंदाजीवर ते दोघे बाद झाले होते.

तत्पूर्वी, १९९९ मध्ये अनिल कुंबळे यांनी दिल्ली कसोटीत पाकिस्तान विरुद्ध दहा बळी घेण्याची किमया केली होती तेव्हा द्रविड व श्रीनाथ हे भारतीय संघाचा भाग होते. त्यानंतर आता एजाज पटेलने या कामगिरीची पुनरावृत्ती केली असताना द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तर श्रीनाथ हे सामनाधिकारी म्हणून मैदानावर हजर होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील

गेल्या १२५ वर्षांत ‘असा’ पराक्रम करणारा अजाज बनला पहिलाच गोलंदाज, आख्ख्या ‘विराटसेने’ला एकट्यानेच धाडलंय तंबूत

माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---