मागील दोन वर्षापासून लांब चाललेल्या पुरुष टी२० विश्वचषकाच्या आयोजन स्थळाबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. शनिवारी (२६ जून) आलेल्या बातमीनुसार, टी२० विश्वचषकाचे आयोजन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामानंतर दोन दिवसांनी संयुक्त अरब अमीराती (युएई) येथेच करण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले होते. आता याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांचे एक महत्त्वपूर्ण विधान समोर येत आहे.
जय शहा यांचे महत्त्वपूर्ण विधान
टी२० विश्वचषकाचे आयोजन कोठे होणार याबाबत अजूनही पक्की माहिती समोर आली नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार हा विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान युएई येथे खेळविण्यात येईल असे सांगितले जात आहे.
याच मुद्द्यावर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “देशातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता हा विश्वचषक युएई येथे खेळला जाऊ शकतो. आम्ही अगदी जवळून परिस्थितीची पाहणी करत आहोत. खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आम्ही अंतिम निर्णय लवकरच कळवू.”
मागील काही काळापासून हा विश्वचषक युएई येथेच हलविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बीसीसीआयचे एक शिष्टमंडळ देखील दुबईला गेले होते.
आयपीएलनंतर होईल विश्वचषक
शुक्रवारी(२५ जून) आलेल्या बातमीनुसार, आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत युएई येथील दुबई, शारजा व अबुधाबी या शहरातील मैदानावर खेळविण्यात येईल. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक सुरू होईल. मुख्य स्पर्धेसाठी आवश्यक असणारे पात्रता फेरीतील सामने ओमान येथे तर मुख्य स्पर्धा युएईमध्ये खेळविण्याचे नियोजन आहे.
लांबत चालले आहे विश्वचषकाचे नियोजन
खरंतर मागीलवर्षीच या विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार होते, तर २०२२ साली ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक होणार होता. मात्र, मागीलवर्षी भारतातील कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा रद्द करून यावर्षी भारतात घेण्याचे ठरले. परंतु, आता भारतात देखील अशीच परिस्थिती असल्याने स्पर्धा नाईलाजाने युएईत खेळली जाऊ शकते. तर पुढीलवर्षी नियोजनाप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमधील एकमेव खेळाडू ज्याला एक धाव, एक बळी आणि एक झेलदेखील घेण्यात आले अपयश
राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएलची निवड करणार्या खेळाडूंवर भडकला वॉर्न, ‘ही’ कारवाई करण्याची मागणी
आयपीएल २०२१ उर्वरित हंगामापूर्वी युएई सरकारच्या ‘या’ नियमामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना मोठा फटका