पुढिल महिन्यात 6 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 28 वर्षीय अष्टपैलू जयंत यादवकडे सोपवण्यात आली आहे. साधारण या स्पर्धेत 23 वर्षांखालील खेळाडू खेळतात पण यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांच्या वयाचा विचार न करता संधी देण्यात आली आहे.
कर्णधार म्हणून निवड झालेल्या यादवने भारताकडून चार कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आहे. त्याने खेळलेल्या 4 कसोटी सामन्यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतकासह 228 धावा केल्या आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने हे शतक मुंबईमध्ये 2016 ला इंग्लंड विरुद्ध केले होते.
ज्यूनियर निवड समीतीची या संघाची निवड करण्यासाठी कोलकता येथे बैठक झाली. यादव बरोबरच या 15 जणांच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज परब सिमरन सिंगचीही निवड झाली आहे. तो यावर्षी बांगलादेशमध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचा अंतिम सामन्यात प्रभारी कर्णधार होता. या स्पर्धेचे विजेतेपद भारताने जिंकले होते.
याबरोबरच दीपक हुडा, नितिश राणा, मयंक मार्कंडे, शिवम मावी या युवा खेळाडूंचीही निवड 15 जणांच्या संघात करण्यात आली आहे.
या स्पर्धेत मागीलवर्षी भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंकेकडे आहेत. तसेच या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, अफगाणीस्तान, ओमान, पाकिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिराती असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील गट अ चे सामने, बाद फेरीचे सामने आणि अंतिम सामना श्रीलंकेमध्ये होईल. तर गट ब चे सामने पाकिस्तानमध्ये होतील. अ गटामध्ये भारतासह श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमानचा समावेश आहे. तर ब गटामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि हाँगकाँगचा समावेश आहे.
असा आहे 15 जणांचा भारतीय संघ: जयंत यादव (कर्णधार), आरडी गायकवाड, अथर्व तायडे, अंकुश बेन्स (यष्टीरक्षक), दीपक हुडा, परब सिमरन सिंग, नितीश राणा, हिम्मत सिंग, एस मुलानी, अंकित राजपूत, प्रसिद्ध कृष्ण, सिद्धार्थ देसाई, मयंक मार्कंडे, अतीथ सेठ आणि शिवम मावी.
महत्त्वाच्या बातम्या:
–मिताली राजला टीम इंडियातून वगळण्याचे रमेश पोवार यांनी दिले स्पष्टीकरण
–आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय गोलंदाजाने घेतली किंग कोहलीची विकेट
–४०८ दिवसानंतर युवराजने काढली क्रिकेटमधील पहिली धाव