भारत विरुद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) महिला संघांमध्ये बुधवारी (१६ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ मधील (ICC Women World Cup 2022) पंधरावा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ३६.२ षटकातच १३४ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंड महिलांनी ३१.२ षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण केले आणि ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला. भलेही भारतीय संघाला या सामन्यात मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने मोठा विक्रम केला आहे.
तिने इंग्लंडविरुद्ध विश्वचषक सामन्यात एक विकेट घेत वनडे क्रिकेटमधील २५० विकेट्सचा आकडा गाठला आहे. असा पराक्रम करणारी ती जगातील पहिली आणि एकमेव महिला (First Indian Player) गोलंदाज बनली आहे.
झुलनने भारताच्या १३५ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडची पहिली विकेट घेतली होती. इंग्लंडची सलामीवीर टॅमी बाउमॉट हिला तिने एका धावेवर पायचित केले होते. ही विक्रमी विकेट घेत तिने वनडे क्रिकेटमधील २५० धावांचा आकडा गाठला आहे. १९९ वनडे सामने खेळताना तिने हा पराक्रम केला आहे.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स
२५० – झुलन गोस्वामी
१८० – कॅथरीन फिट्झपॅट्रिक
१८० – अनिसा मोहम्मद
१६८ – शबनिम इस्माईल
१६४ – कॅथरीन ब्रंट
हेही वाचा- ‘चकदाह एक्सप्रेस’ झुलन गोस्वामीने विश्वचषकात रचला इतिहास! तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा मोडलाय विश्वविक्रम
कपिल देव यांची केली बरोबरी
याव्यतिरिक्त झुलनने हा विक्रम करत भारताचे महान पुरुष क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांची बरोबरी केली आहे. कपिल देव यांनी पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २५० वनडे विकेट्स घेण्याची किमया साधली होती. आता महिला क्रिकेटमध्ये झुलन गोस्वामीने हा किर्तीमान केला आहे.
Jhulan Goswami now has 250 wickets in ODIs 🙌
What a player!#CWC22 pic.twitter.com/0bLllvlUbg
— ICC (@ICC) March 16, 2022
भारतीय खेळाडूंचे निराशाजनक प्रदर्शन
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारताकडून एकही फलंदाज समानाधनकारक खेळी करू शकली नाही. सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने सर्वाधिक ३५ धावा केल्या. यष्टीरक्षक रिचा घोष हिने ३३ तर झुलन गोस्वामी हिने २० धावा जोडल्या. कर्णधार मिताली राजसह भारताच्या ७ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाल्या. परिणामी इंग्लंडच्या गोलंदाजांनी फक्त ३६.२ षटकातच भारतीय संघाला १३४ धावांवर सर्वबाद केले.
प्रत्युत्तरात गोलंदाजीतही मेघना सिंग व्यतिरिक्त इतर गोलंदाजांनी निराशा केली. तिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ७.२ षटके गोलंदाजी करताना २६ धावा देत तिने या विकेट्स घेतल्या. झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकार यांना मात्र फक्त १ विकेट घेता आली.
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या माजी शिलेदाराकडे मोठी जबाबदारी! बांगलादेशी फलंदानांना शिकवणार कशी करायची ‘पॉवर हिटिंग’
दोन वर्षांच्या अंतरात एकाच दिवशी कसोटीत झालेले संथ अन् जलद द्विशतक, जाणून घ्या त्या सामन्यांबद्दल
आयपीएलला राजकारणाचा विळखा? मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या खेळाडूंच्या गाड्या, चौघांना अटक; वाचा कारण