श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेली कसोटी मालिका इंग्लडचा कर्णधार जो रूटसाठी कमालीची लाभदायी ठरली आहे. रूटने मालिकेतील दोन्ही कसोटीत जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडच्या फलंदाजीचे नेतृत्व केले. मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १८६ धावांची खेळी करताना रूटने इंग्लंडच्या माजी दिग्गजांना पछाडत इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला.
चौथ्या स्थानी दाखल झाला रूट
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेला रूट चालू मालिकेत कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या कसोटीत रूटने विक्रमी द्विशतक झळकावले होते. तर, दुसऱ्या या सामन्यातही त्याने १८६ धावांची लाजवाब खेळी केली. रूटच्या योगदानामुळे इंग्लंड संघ मालिका विजयाच्या जवळ आला आहे. दोन्ही सामन्याच्या चार डावात मिळून रूटने ४२६ धावा जमविल्या आहेत. दुसरी कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला अखेरच्या दिवशी १६४ धावांचे आव्हान श्रीलंकेने दिले आहे.
रूटने मागे टाकले इंग्लिश दिग्गजांना
सन २०१२ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या रूटने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत ९९ कसोटीच्या १८० डावात ८,२३८ धावा काढल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानी होता. मात्र, दोन सामन्यांच्या मालिकेतील दैदीप्यमान कामगिरीमुळे तो या यादीत चौथ्या स्थानी आला आहे. रूटने डेविड गावर, केविन पीटरसन व जेफ्री बॉयकॉट यांना पछाडले. आता रूटच्या पुढे फक्त एलिस्टर कूक, ग्रॅहम गूच व एलेक स्टीवर्ट हे दिग्गज आहेत.
भारताविरुद्ध यशस्वी ठरला आहे रूट
रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ ५ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रूटने भारताविरुद्ध नेहमीच दिमाखदार कामगिरी केलेली दिसून येते. रूटने भारताविरुद्ध १६ कसोटीमध्ये खेळताना ५६.८४ च्या शानदार सरासरीने १,४२१ धावा ठोकल्या आहेत. यात चार शतकांचा देखील समावेश आहे. आगामी मालिकेतही इंग्लंड संघाला रूटकडून अशाच खेळाचे अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या:
SL vs ENG : दुसर्या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश
रिषभ पंतला अजूनही वाटते त्या पराभवाची खंत, म्हणाला
जर आरसीबीने ही गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार