ब्रिजटाऊन। इंग्लंड संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने शतकी खेळी केली असून मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
बुधवारी (१६ मार्च) वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पहिल्याच दिवशी जो रुटने (Joe Root) शतकी खेळी केली. तो पहिल्या दिवसाखेर २४६ चेंडूत १२ चौकारांसह ११९ धावा करून नाबाद आहे. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २५ वे कसोटी शतक (25th Test Century) ठरले आहे.
त्यामुळे तो आता सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत २२ व्या क्रमांकावर आला आहे, तर सर्वाधिक कसोटी शतके करणारा तो इंग्लंडचा ऍलिस्टर कूकनंतरचा दुसरा खेळाडू आहे. कूकने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३३ शतके केली आहेत.
फॅब फोरमध्ये विलियम्सनला टाकले मागे
सध्याच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), केन विलियम्सन (Kane Williamson) आणि जो रुट (Joe Root) या चार फलंदाजांची गणना फॅब फोरमध्ये (Fab Four) केली जाते. हे चौघेही साधारण सारख्याच वयाचे असून त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही जवळपास एकाच काळात झाले आहे. तसेच या चौघांनीही गेल्या काही वर्षात त्यांच्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर चौघांनीही आपल्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. त्यामुळे नेहमीच त्यांच्यातील कामगिरीची तुलना होत असते.
सध्या हे चौघेही क्रिकेटमध्ये सक्रिय असून आता या चौघांमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या बाबतीत रुटने विलियम्सनला मागे टाकले आहे. तसेच रुटची नजर आता विराट आणि स्मिथच्या विक्रमावर आहे. विलियम्सनने कसोटीत २४ शतके केली आहेत. त्याचबरोबर विराट आणि स्मिथ यांनी प्रत्येकी २७ शतके कसोटी कारकिर्दीत केली आहेत.
रुटला १० हजार धावा करण्याची संधी
रुट बार्बाडोस कसोटीत नाबाद असून आता त्याच्याकडे कसोटी कारकिर्दीत १० हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अजून २५९ धावांची गरज आहे. जर त्याने या धावा केल्या, तर तो १० हजार कसोटी धावा करणारा इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू बनेल. सध्या त्याच्या नावावर ११६ कसोटीतील २१३ डावात ९८४१ धावा आहेत.
इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी शतके करणारा क्रिकेटपटू
रुटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील शतकी खेळी केली होती. त्यावेळी तो इंग्लंडचा सर्वाधिक शतके करणारा कसोटी कर्णधार ठरला होता. कर्णधार म्हणून आता त्याच्या नावावर १४ कसोटी शतके आहेत.
पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व
बार्बाडोस कसोटीत पहिल्या दिवशी रुटच्या शतकामुळे इंग्लंड संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर ८९.५ षटकात ३ बाद २४४ धावा केल्या. रुट व्यतिरिक्त या डावात डॅनिएल लॉरेन्सने ९१ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कब खून खोलेगा रे तेरा’, बाबर आझमने २ वर्षांनंतर शतक केल्याने विराट कोहली होतोय ट्रोल
वेस्ट इंडीज वि इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी साक्षात ‘युनिव्हर्स बॉस’ची हजेरी; पाहा फोटोज