इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटने दीडशतकी पार खेळी केली आहे. यासह रुट हा सलग तीन कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा करणारा केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. त्याच्यापुर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांनी हा शानदार विक्रम नोंदवला होता.
तब्बल ८४ वर्षांपुर्वी म्हणजे १९३६-३७ मध्ये इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील तिसऱ्या (२७० धावा) आणि चौथ्या सामन्यात (२१२ धावा) ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करताना ब्रॅडमन यांनी १५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, त्यापुढील अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यातही त्यांनी १६९ धावांची आतिशी खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ च्या फरकाने खिशात घातली होती.
याबरोबरच कर्णधार रुटने श्रीलंका आणि भारतात मिळून आतापर्यंत तीन सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह त्याने इंग्लंडचे माजी कर्णधार व्हॅली हमन्ड यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्यांनी कर्णधार म्हणून परदेशातील ३ कसोटी सामन्यात १५० हून अधिक धावा करण्याचा किर्तीमान मिळवला होता.
सलग ३ कसोटी सामन्यात १५०+ धावा करणारे कर्णधार
सर डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया, १९३६-३७)
जो रुट (इंग्लंड, २०२१)
पहिल्या डावात इंग्लंड मजबूत स्थितीत
भारत आणि इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज (०६ फेब्रुवारी) दुसरा दिवस चालू आहे. इंग्लंडने ३ बाद २६३ धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर रॉरी बर्न्स ३३ धावा, डॉम सिब्ले ८७ धावा आणि डॅनियल लॉरेन्स शून्य धावांवर बाद झाले होते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत कर्णधार जो रूट नाबाद १६८ धावांवर खेळत आहे. तर बेन स्टोक्सही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. यासह इंग्लंडने दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत ३८६ धावा फलकावर नोंदवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर जो रुट! शतकानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचे झुंजार दीडशतक, मिळवला नवा किर्तीमान
विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; म्हणाला ‘तो खूप दयाळू आहे, त्याने…’





