टी20 विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान छोटेखानी टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यातून इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर याने पुनरागमन केले. दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धची संपूर्ण मालिका बाकावर बसलेला बटलर या सामन्यात चमकला. त्याने या सामन्यात अशी काही फलंदाजी केली की, सर्वजण अवाक झाले.
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय इंग्लंडसाठी सलामीला उतरलेला कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी चुकीचा ठरवला. वेस्ट इंडीजविरूद्ध शानदार गोलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांनी अक्षरशः फोडून काढले. दोघांनी षटकार चौकारांची बरसात करत, 11.2 षटकात 132 धावांची सलामी दिली. नॅथन एलिसने ही जोडी फोडली.
जवळपास दीड महिना क्रिकेटपासून दूर राहिलेला बटलर या सामन्यात अक्षरशः आग ओकत होता. त्याने 32 चेंडूवर 8 चौकार व 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 212 पेक्षा जास्त राहिला. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक ठरले.
इंग्लंडने या सामन्यात फलंदाजीत शानदार कामगिरी केली. बटलरच्या 68 व हेल्सच्या 84 धावांच्या जोरावर त्यांनी निर्धारित 20 षटकात 208 धावा उभारल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने अर्धशतक झळकावले. मार्कस स्टॉयनिस, मिचेल मार्श व मॅथ्यू वेड यांनी संघाच्या विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर त्यांना यश आले नाही. अखेर त्यांना आठ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ