जून महिना, इंग्लंडचे मैदान आणि आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना, यांचा योगायोग फारंच अनोखा आहे. त्यातही भारतीय संघाच्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच लागू होते. नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. खरं तर हा सामना आधी लॉर्ड्समध्ये होणार होता. मात्र, तेथून साऊथम्पटन येथे हलवण्यात आला. इथे हलवल्यानंतरही लहरी हवामानामुळे अडथळा आला, पण अखेर या स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड संघाने आपल्या नावावर केले. यापूर्वीही भारतीय संघाने इंग्लंडमध्ये तेही जून महिन्यातच आयसीसीच्या स्पर्धांचे अतिमहत्त्वाचे अंतिम सामने खेळले आहेत.
या लेखात आपण त्या सामन्यांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
१८- २३ जून २०२१, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
दिनांक १८- २३ जून, २०२१ मध्ये खेळण्यात आलेल्या भारत आणि न्यूझीलंड संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाची गाडी गडबडताना दिसली. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान पहिल्या डावात भारतीय संघाने सर्वबाद २१७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने सर्वबाद २४९ धावा केल्या आणि ३२ धावांची आघाडी घेतली.
यानंतर भारताचा दुसरा डाव १७० धावांवर संपुष्टात आला. पण भारताने पहिल्या डावात ३२ धावांची पिछाडी स्विकारल्याने न्यूझीलंडला केवळ १३९ धावांचे आव्हान देता आले. हे आव्हान न्यूझीलंडने लिलया पार करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२३ जून २०१३, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना
दिनांक २३ जून, २०१३ मध्ये बर्मिंगहॅम येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात आला होता. खरं तर या सामन्यादरम्यानही पावसाने घोळ घातला होता. त्यामुळे ५० षटकांचा सामना २० षटकांमध्येच खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत १२९ धावा केल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला ८ विकेट्स गमावत केवळ १२४ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाने अवघ्या ५ धावांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. यासोबतच तत्कालिन कर्णधार एमएस धोनीच्या शिरपेचात आयसीसीच्या तिसऱ्या ट्रॉफीचेही तुरा लावण्यात आला. म्हणजेच धोनीने आयसीसीच्या तिसऱ्या ट्रॉफीचे विजेतेपदही आपल्या संघाला मिळवून दिले. त्यापूर्वी त्याने २००७ आणि २०११ या विश्वचषकाचे विजेतेपदही जिंकले होते.
२५ जून १९८३, विश्वचषकाचा अंतिम सामना
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे २५ जून, १९८३ होय. या दिवशी भारत आणि वेस्ट इंडिज संघात १९८३ विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्स येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व कपिल देव करत होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्वबाद १८३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने सर्वबाद फक्त १४० धावाच केल्या होत्या. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने ४३ धावांनी जिंकत पहिल्या वहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC स्पर्धेत या ५ फलंदाजांच्या बॅटमधून निघाल्या सर्वाधिक धावा, भारताच्या रहाणेचाही समावेश
आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे ६ भारतीय कर्णधार; विराटच्या नावावर आहे ‘हे’ एकमेव जेतेपद