Kamran Akmal Slams PCB: सध्या भारतीय संघ क्रिकेटविश्वात यशाचा झेंडा फडकावत असताना, शेजारी देश पाकिस्तानची पडझड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतातील देशांतर्गत क्रिकेटही सातत्याने प्रगती करत आहे. याच कारणामुळे आज भारतीय संघाकडे प्रतिभाशाली खेळाडूंची कमतरता नाही. भारतीय क्रिकेटपटू दैशांतर्गत पातळीवर इतका अलौकिक खेळ दाखवत आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळाडूंना अशी कामगिरी करणे जड जाते. अशातच युवा भारतीय फलंदाज मुशीर खानच्या फलंदाजीवर प्रभावित होऊन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने पीसीबीला (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) फटकारले आहे.
19 वर्षीय मुशीर खान रणजी ट्रॉफी आणि 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. भारत अ संघाविरुद्ध खेळताना त्याने पहिल्या डावात 373 चेंडूत 181 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळेच भारत ब संघाला पहिल्या डावात 321 धावा करता आल्या. मुशीर खानच्या खेळीने अकमल खूपच प्रभावित झाला आहे.
अकमलने दुलीप ट्रॉफीची त्याच्या देशाच्या देशांतर्गत स्पर्धेशी तुलना केली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर या संदर्भात बोलताना तो म्हणाला, ‘पीसीबीच्या अधिकाऱ्यांना एका खोलीत बंद करून मुशीर खानची खेळी दाखवण्याची गरज आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने 181 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. खेळाडू असे घडवले जातात हे अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. माझ्या मते, चॅम्पियन्स वनडे चषक हा पैशाबरोबरच वेळेचा अपव्यय आहे. या निर्णयांमुळे मुलांची विचारसरणी बिघडेल आणि त्यांचा हा खेळ पाहण्यातला रस कमी होईल.’
पीसीबीने अलीकडेच चॅम्पियन्स वनडे चषक स्पर्धा सुरू केली आहे, ज्यामध्ये 5 संघ सहभागी होणार आहेत. 12 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यासाठी सर्व संघही जाहीर करण्यात आले आहेत. कामरान अकमलशिवाय इतर अनेक माजी खेळाडूंनीही पीसीबीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पीसीबीने कसोटी फॉर्मेटमध्ये संघाची कामगिरी सुधारण्यासाठी काही पावले उचलली पाहिजेत, असे बहुतांश क्रिकेटपटूंचे मत आहे, परंतु त्यांनी वनडे स्पर्धा आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तो तुमच्या पाठीमागे बोलत नाही, पाकिस्तानला गंभीरसारख्या कोचची गरज; कुणी केलं विधान?
आता होणार धिंगाणा! पंत जुन्या फॉर्मात परतला, दुलीप ट्रॉफीत झळकावले वेगवान अर्धशतक
19 वर्षीय खेळाडू करणार भारतीय संघात पदार्पण? माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा