उद्यापासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
त्याला भारताविरुद्ध हेमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यादरम्यान डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला टी20 मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यालाही मुकावे लागले होते.
त्याच्या दुखापतीबद्दल न्यूझीलंड संघाचे फिजिओ विजय वल्लभ यांनी माहिती दिली की ‘केनचे एक्स-रे स्कॅन करण्यात आले. यातून त्याला गंभीर दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण तरीही त्याच्यासाठी पुढील काही दिवस खांद्याला आराम देणे, योग्य राहिल.’
‘तो या आठवड्यात त्याचे फिटनेस ट्रेनिंग सुरु ठेवेल. तसेच येत्या शुक्रवारपासून(7 फेब्रुवारी) फलंदाजीला सुरुवात करेल. जेणेकरुन तो 11 फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असेल.’
त्यामुळे आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी विलियम्सन ऐवजी मार्क चॅपमनचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. 25 वर्षीय चॅपमनने मागील 10 दिवसात न्यूझीलंड अ संघाकडून भारत अ संघाविरुद्ध खेळताना सलग दोन शतकी खेळी केल्या आहेत.
तसेच विलियम्सनच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम न्यूझीलंडच्या वनडे संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळेल.
टीम इंडियाला उद्या मिळणार नवीन सलामीवीरांची जोडी, विराट कोहलीने केला खूलासा
वाचा👉https://t.co/BSL9gUqppR👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020
दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी 'या' खेळाडूची झाली भारताच्या वनडे संघात निवड
वाचा👉https://t.co/k5VBFPNLkv👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020