भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने बरेचसे मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. ५० पेक्षा अधिक डाव उलटून गेले तरी देखील त्याच्या शतकाची प्रतीक्षा काही संपेना. त्यामुळेच समालोचकापासून ते चाहत्यांपर्यंत सर्वच विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान माजी भारतीय कर्णधाराने विराट कोहलीचे समर्थन केले आहे.
नुकतीच इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना रद्द करण्यात आला होता. उर्वरित ४ कसोटी सामन्यात विराट कोहलीला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. परंतु माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीचे समर्थन केले आहे. तसेच असे देखील म्हटले आहे की, जेव्हा विराट कोहली फॉर्ममध्ये येईल त्यावेळी तो शतक सोडा तिहेरी शतक झळकावेल.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले की, “इतके वर्ष तो सतत धावा करत होता, चांगली कामगिरी करत होता, त्यावेळी कोणीच असे म्हटले नव्हते की, तो संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे त्याच्या फलंदाजीवर फरक पडतोय. आता अचानक हे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?. लोकं त्याला सल्ले देऊ लागले आहेत. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात उतार चढाव येतच असतात. ज्यावेळी त्याने इतके शतक आणि दुहेरी शतक झळकावले त्यावेळी त्याच्यावर दबाव नव्हता का? याचा अर्थ असा की, कर्णधारपदावर चर्चा व्हायलाच नको, चर्चा क्षमतेवर झाली पाहिजे.”
“कारकिर्दीत ग्राफ हा नेहमीच खालीवर जात असतो. परंतु असे कधीपर्यंत होणार? २८ ते ३२ हे असं वय असतं जिथे खेळाडूंची कारकीर्द भरभराटीला येत असते .तो आता अनुभवी खेळाडू झाला आहे. तो जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये येईल तेव्हा तो शतक किंवा दुहेरी शतक नव्हे तर तिहेरी शतक झळकावेल. तो आता अधिक परिपक्व झाला आहे आणि त्याला फिटनेसची समस्या देखील नाही. त्याने फक्त स्वतःला ओळखून मोठी खेळी खेळण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईविरुद्ध ‘या’ तगड्या प्लेइंग Xiसह उतरेल धोनी, पाहा संभाव्य संघ
कट्टर आरसीबीप्रेमी! विराटच्या टीमचे नाव कोरत सचिनची जबरदस्त हेयरस्टाईल, चाहत्यांना खूपच आवडली