भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देवने आपल्या खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला आतापर्यंत विशेष कामगिरी करण्यात यश आलेले नाही. पहिला सामना गमावल्यानंतर ॲडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल कसोटीत त्याची बॅट शांत राहिली. आता 14 डिसेंबरपासून गाबा येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी कपिल देव म्हणाले की, पुनरागमन करण्यासाठी त्याला फक्त एका मोठ्या खेळीची गरज आहे.
एएनआयशी बोलताना कपिल देव म्हणाले, ‘प्रत्येकाला वाईट आणि चांगल्या काळाचा सामना करावा लागतो. एके दिवशी रोहितही मोठ्या खेळाडूसारखी कामगिरी करत होता. त्याच्याकडे खूप प्रतिभा आणि क्षमता आहे. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही डावात रोहितच्या बॅटमधून एकूण 9 धावा झाल्या. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यामुळे त्याची लय बिघडली असेल. पण त्याची एक मोठी खेळी त्याला फाॅर्ममध्ये आणू शकते’.
सप्टेंबरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून सुरू झालेल्या चालू यंदाच्या कसोटी हंगामात, रोहितने सहा कसोटी सामन्यांमध्ये 12 डावांत 11.83 च्या सरासरीने केवळ 142 धावा केल्या आहेत. ज्यात सर्वोत्तम धावसंख्या 52 धावा आहे. त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. या वर्षभरात रोहितने 12 कसोटीतील 23 डावांत 27.13 च्या सरासरीने 597 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची या वर्षातील 131 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. ॲडलेडमध्ये ओपनिंगमधून माघार घेण्याच्या निर्णयानंतर तो गाबामध्ये ओपनिंग करताना दिसण्याची शक्यता आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना कपिल देव यांनी संघाला खेळाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘आत्तासाठी, मी एवढेच म्हणेन की जा आणि खेळाचा आनंद घ्याट’. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर सुरू होणार आहे. भारताने पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर 295 धावांनी विजय मिळवून मालिकेची सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत ॲडलेडमध्ये मालिकेत बरोबरी साधली.
हेही वाचा-
अजिंक्य रहाणेच्या झंझावातात हार्दिक पांड्याचा संघ उडाला! मुंबईची फायनलमध्ये धडक
IND vs AUS: गाबा कसोटीत भारत दुहेरी संकटात, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर
IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, दोनदा वर्ल्ड जिंकणाऱ्या खेळाडूची प्रशिक्षकपदी नियुक्ती