बुधवारी(8 मे) दिल्ली कॅपिटल्सने सनराईज हैदराबादवर आईपीएल 2019 च्या एलिनिनेटर सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीला शेवटच्या दोन चेंडूत 2 धावांची गरज असताना किमो पॉलने चौकार मारत दिल्लीला हा विजय मिळवून दिला. हैद्राबादकडून शेवटच्या षटकात खलील अहमद गोलंदाजी करत होता.
विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी 2016 ला 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात किमो पॉल आणि खलील अहमद अशाच प्रकारे आमने सामने आले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज आणि भारतीय संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळत होते.
या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात 3 धावांची गरज होती. भारताकडून शेवटच्या षटकात खलील गोलंदाजी करत होता. यावेळी या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॉलने विजयी धाव काढत 19 वर्षांखालील वेस्ट इंडिज संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
बुधवारी पार पडलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैद्राबादने 20 षटकात 162 धावसंख्या उभारली. हैद्राबादकडून मार्टिन गप्टीलने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर मनिष पांडेने 30 धावांची खेळी केली.
दिल्लीकडून गोलंदाजीत किमो पॉलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्माने 2 आणि ट्रेंट बोल्ट, अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 163 धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 19.5 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 163 धावांचे आव्हान पूर्ण केले.
गोलंदाजीत हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद व राशीद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर दिपक हुडाने 1 विकेट घेतली.
आता दिल्लीचा सामना 10 तारखेला क्वालिफायर 2 मध्ये चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. क्वालिफायर 2चा सामना जिंकणारा संघ 12 तारखेला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–गमतीशीर! श्रेयस अय्यरने नाणेफेकीवेळी केली मजेदार चूक, पहा व्हिडिओ
–२०१९ विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना १५ दिवसांसाठी मिळू शकते पत्नीची सोबत
–आयपीएलच्या इतिहासात असा बाद होणारा अमित मिश्रा दुसराच खेळाडू, पहा व्हिडिओ






