यजमान केरळा ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये नवीन वर्षात विजयाने सुरुवात केली. केरळाने 3-1 अशा फरकाने जमशेदपूर एफसीवर विजय मिळवून 25 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. केरळा ब्लास्टर्सकडून अपोस्टोलॉस जियानू, दिमित्रिओस डिएमांटाकोस आणि एड्रीयन लुना यांनी गोल केले, तर जमशेदपूरकडून डॅनिएल चुक्वूने एकमेव गोल केला.
उभय संघ हिरो आयएसएलमध्ये 13 वेळा समोरासमोर आले होते आणि त्यापैकी 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर दोघांनी प्रत्येकी 3 विजय मिळवले होते. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सने 1-0 असा विजय मिळवला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी जमशेदपूर सज्ज होते आणि दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात केली. पाचव्या मिनिटाला यजमान केरळा ब्लास्टर्सने सोपी संधी गमावली. एड्रीयन लुनाला गोलजाळीच्या तोंडावर असलेला चेंडू पोस्टमध्ये पाठवता आला नाही. जमशेदपूर एफसीने सुटकेचा निश्वास टाकला. पण, नवव्या मिनिटाला केरळाने गोल केला. दिमित्रिओस डिएमांटाकोसच्या पासवर अपोस्टोलॉस जियानूने यजमानांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरही केरळाकडून गोलचे प्रयत्न सुरूच राहिले.
मात्र, जमशेदपूरने पलटवार केला. 17व्या मिनिटाला इशान पंडिता चेंडू घेऊन बॉक्समध्ये शिरणार तितक्यात केरळाचा गोलरक्षक प्रभसुखन गिल पुढे येऊन पंडिताला रोखले. पण, चेंडूवर ताबा राखण्यात तो अपयशी ठरला अन् डॅनिएल चुक्वूने अप्रतिम गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. केरळाचे फॅन्स एकदम गप्प झाले. केरळाच्या या मैदानावर जमशेदपूर एकही सामना हरलेला नाही आणि त्यामुळे यजमानांचे चाहते चिंतीत झाले. 30व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्समध्ये बोरिस सिंगच्या हाताला चेंडू लागला अन् केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी दिली गेली. दिमित्रिओस डिएमांटाकोसने सहज गोल करून पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली. 32व्या मिनिटाला सहल समदचा पोस्ट जवळून गोल करण्याचा प्रयत्न जमशेदपूरचा गोलरक्षक विशाल यादवने अडवला.
पहिल्या हाफ मध्ये केरळा ब्लास्टर्सचा खेळ वरचढ राहिला. पण, त्यांनी मिळालेल्या बऱ्याच संधी गमावली. जमशेदपूरनेही काही संधी गमावल्या, परंतु मध्यंतरानंतर या दोन्ही संघाकडून जबरदस्त खेळाची चाहत्यांना अपेक्षा लागून राहिली. यजमानांनी दुसऱ्या हाफमध्ये गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्याचसोबत त्यांनी बचावही भक्कम ठेवला. 65व्या मिनिटाला कर्णधार लुनाने केरळा ब्लास्टर्सची आघाडी 3-1 अशी अधिक भक्कम केली. जमशेदपूरच्या बचावफळीतील उणीवा अचूक हेरून लुनाने हा गोल केला. या गोल नंतर जमशेदपूर पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेले. केरळा ब्लास्टर्स कडून सातत्याने आक्रमण सुरूच राहिले आणि जमशेदपूरचे खेळाडू हतबल झाले. केरळाच्या या मैदानावर ते प्रथमच हरले.
പുതുവർഷത്തിൽ ഒരു ഉജ്ജ്വല തുടക്കം 💛😍#KBFCJFC #ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/ombGVUAcA0
— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) January 3, 2023
निकाल: केरळा ब्लास्टर्स 3 (अपोस्टोलॉस जियानू 9 मि., दिमित्रिओस डिएमांटाकोस 31 मि. (पेनल्टी), एड्रीयन लुना 65 मि. ) विजयी वि. जमशेदपूर एफसी 1 (डॅनिएल चुक्वू 17 मि.).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं हार्दिकच्या कॅप्टन्सीला! अखेरच्या षटकात खेळलेला जुगार ठरला फायद्याचा; विजय झाला सुकर
सहा महिन्यांपासून पुणेकर राहुल पाजतोय फक्त पाणीच! अजूनही पदार्पणाची प्रतिक्षाच