गेल्या पाच दिवसांपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नई येथे चालू असलेला पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. पाहुण्या इंग्लंडने २२७ धावांच्या फरकाने यजमान भारतावर दणदणीत विजय मिळवला. यासह इंग्लंडने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने ट्विटरद्वारे भारतीय संघाला आपण दिलेल्या चेतावणीची आठवण करुन दिली आहे.
पीटरसनने भारतीय संघाला दिलेली चेतावणी-
काही दिवसांपुर्वी भारतीय संघाने निर्णायक अशा चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयासह भारताने २-१ च्या फरकाने मालिकाही जिंकली होती. सोबतच तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली होता. या ऐतिहासिक विजयानंतर भारताला मायभूमीत इंग्लंडचा सामना करायचा होता. त्यामुळे पीटरसनने ट्विट करत भारतीय संघाला सावध राहण्याचा इशारा दिला होता.
त्याने लिहिले होते की, “भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करावा. कारण बऱ्याच अडचणींना सामोरे जात तुम्ही हे यश मिळवले आहे. परंतु खरा संघ तर काही आठवड्यानंतर तुमच्या पुढे येणार आहे, ज्याला तुम्हाला तुमच्याच मायभूमीत पराभूत करून दाखवावे लागणार आहे. सतर्क राहा, २ आठवड्यात खूप जास्त जल्लोष साजरा करण्यापासून सावध राहा.”
https://twitter.com/KP24/status/1351501549013504001?s=20
भारतीय संघाच्या हारकिरीनंतर पीटरसनने मारला टोमणा
यानंतर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या हातून भारताचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळे पीटरसनने भारतीय संघाला चिमटा काढला आहे. त्याने ट्विट करत लिहिले आहे की, “भारत, आठवण आहे ना. मी फार पुर्वीच, तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांना पराभूत केल्यानंतर जास्त आनंद साजरा करू नका अशी चेतावणी दिली होती.”
https://twitter.com/KP24/status/1359059768082579456?s=20
भारताचा चेन्नई कसोटीत दारुण पराभव
नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई कसोटीत भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग ७ विजयांच्या पराक्रमानंतर विराटच्या नेतृत्वाखाली ४ पराभव, झाली नकोशा विक्रमाची नोंद
गांगुली-धोनीसारख्या कर्णधारांना न जमलेला किर्तीमान कोहलीच्या नावावर, ठरला पहिलाच भारतीय कॅप्टन





