आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. खेळाडू कायम राखण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर, खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होईल. या लिलावासाठी तब्बल १,०९७ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. मात्र, या मिनी लिलावाआधी आयपीएलमधील एक प्रमुख संघ आपल्या संघाच्या नावात व लोगोमध्ये बदल करण्याची बातमी समोर येत आहे.
हा संघ नाव व लोगोमध्ये बदल करण्याची शक्यता
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा व इतरांच्या मालकीचा असलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ आपल्या नावात व लोगोमध्ये बदल करण्याचे वृत्त समोर येत आहे. एका आघाडीच्या क्रीडासंकेतस्थळाच्या बातमीनुसार, ‘मोहाली स्थित आयपीएल फ्रॅंचाईजी किंग्स इलेव्हन पंजाब आपल्या नावांमध्ये तसेच लोगोमध्ये बदल करू शकतो. चेन्नई येथे होणाऱ्या आयपीएल २०२१ लिलावाआधी याबाबतची घोषणा करण्यात येऊ शकते.’
एकदाही आयपीएल विजेता बनला नाही किंग्स इलेव्हन पंजाब संघ
किंग्स इलेव्हन पंजाब संघ आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामात सहभागी झाला आहे. मात्र, त्यांना एकदाही विजेतेपद मिळविता आले नाही. जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात पंजाबने २०१४ च्या आयपीएल हंगामात अंतिम फेरीत धडक मारली होती. अटीतटीच्या झालेल्या त्या अंतिम सामन्यात कोलकता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सोबतच उद्योगपती नेस वाडिया, मोहित बर्मन व करण पॉल या संघाचे सहमालक आहेत.
दिग्गज खेळाडू खेळले आहेत पंजाबसाठी
आयपीएलमध्ये २००८ पासून सहभागी होत असलेल्या पंजाबसाठी ऍडम गिलख्रिस्ट, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, ब्रेट ली या आंतरराष्ट्रीय दिग्गजांसह युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, श्रीसंत, पियुष चावला, मुरली विजय यांच्यासारखे मातब्बर भारतीय खेळाडू खेळले आहेत.
केएल राहुल भूषवत आहे संघाचे कर्णधारपद
सध्या किंग्स इलेव्हन पंजाबची धुरा भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल याच्या खांद्यावर आहे. तसेच, संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे काम पाहतात. सध्या राहुलच्या दिमतीला ख्रिस गेल, मयंक अगरवाल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध खेळाडू आहेत. आगामी आयपीएल लिलावासाठी पंजाबकडे सर्वाधिक ५३.२० कोटी रुपये शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूट फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड मोडू शकेल, ‘या’ दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
बंगलोरच्या संघात संजय बांगर यांची ‘रॉयल’ एंट्री, संघासाठी पार पाडणार ‘ही’ भूमिका
एकेकाळी बूट घ्यायला ही पैसे नसणारी सोनाली शिंगटे आज आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूंपैकी एक