परिस्थिती अत्यंत गरीब असूनही अनेक खेळाडू क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परिस्थितीशी दोन हात करत मेहनतीच्या जीवावर अखेर त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होते.
अशीच काहीशी कहाणी कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाकडून खेळणारा डाव्या हाताचा फलंदाज रिंकू सिंगची आहे, जो उत्तर प्रदेशच्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळतो. हा खेळाडू आयपीएलमध्ये येण्यापूर्वी अत्यंत गरीब होता. आयपीएलमध्ये त्याची निवड झाल्यानंतर त्याचे आयुष्यही बदलून गेले.
अलीगढ येथे 1997 साली रिंकु सिंगचा जन्म झाला. त्याचे वडील घरोघरी जाऊन सिलेंडरची डिलिव्हरी करण्याचे काम करतात. रिंकूला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचा मोठा भाऊ अॅटो रिक्षा चालवतो. तर दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतो.
इयत्ता नववी फेल असलेल्या रिंकू सिंगचे क्रिकेटवर अति प्रेम होते. मात्र घरात आर्थिक तंगी असल्याने त्यालाही कामावर जावे लागले. त्याच्या भावाने त्याला एका कार्यालयात झाडू मारण्याचे काम मिळवून दिले होते. त्यांचे शिक्षण ही जास्त झाले नव्हते. त्यामुळे त्याला असे काम मिळाले.
रिंकू सिंगने दिल्लीमध्ये एक क्रिकेट मालिका खेळला. यात त्याला मालिकावीराचा पुरस्कार म्हणून मोटारसायकल देण्यात आली. त्याने ही मोटारसायकल त्याच्या वडिलांना दिली. त्याचे वडील सिलेंडर डिलेव्हरीला सायकल ऐवजी आता मोटारसायकलवर करत आहेत. त्याच्या कुटुंबावर पाच लाखाचे कर्ज देखील होते.
याच दरम्यान, रिंकू सिंग क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता. ‘अ’ दर्जाच्या सामन्यात 2014 साली विदर्भाविरुद्ध खेळताना पदार्पण केले आणि पुढील वर्षी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळतानाही दिसून आला. तिथेही त्याने लाजवाब कामगिरी केली. रिंकू सिंग उत्तर प्रदेशच्या 19 वर्षाखालील संघाकडून क्रिकेट खेळल्याने जो पैसा यायचा त्याच्यावर त्याचे घर चालायचे.
अखेर 2018 साली त्याचे आयुष्य बदलले. आयपीएल 2018 च्या लिलावात रिंकू सिंगला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. वास्तविक पाहता 20 लाख रुपये इतकीच त्याची बेस प्राइज होती. या मिळालेल्या पैशातून त्याने आपल्या कुटुंबावर असलेले कर्ज फेडून टाकले तसेच मोठा भाऊ आणि बहीणीच्या लग्नात मदत केली.
रिंकू सिंग हा खरोखरच मॅचविनर खेळाडू आहे. मोठमोठे षटकार मारण्यात माहीर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो 60 च्या सरासरीने धावा करतो. त्यात खूप टॅलेंट भरलेले आहे. हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. लवकरच तो मैदानात पुन्हा दिसून येणार आहे.