आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध जोरदार पुनरागमन केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने न्यूझीलंड संघाचा धुव्वा उडवला. रोहित शर्मासाठी पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती आणि या मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली. चला तर पाहूया या मालिकेतील ५ महत्वाचे खेळाडू ज्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
१)रोहित शर्मा : विराट कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला टी २० संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याने प्लेइंग ईलेव्हेनची निवड करण्यापासून ते कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी हे सर्व निर्णय अचूक घेतले होते. तसेच फलंदाजी मध्ये देखील त्याचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याने ३ टी२० सामन्यात १५९ धावा चोपल्या. यासह मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला.
२) हर्षल पटेल : भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात हर्षल पटेलने देखील मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅप पटकावल्यानंतर त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध पार पडलेल्या टी २० मालिकेत संधी देण्यात आली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी केली आणि २५ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच तिसऱ्या टी२० सामन्यात देखील ३ षटकात २६ धावा देत २ गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करताना देखील त्याने ११ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी केली होती.
३) केएल राहुल : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल हा या मालिकेत चांगल्याच फॉर्म मध्ये होता. त्याने २ सामन्यात ४० च्या सरासरीने ८० धावा केल्या होत्या. रांचीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात केएल राहुलने ६५ धावांची खेळी केली होती.
४) अक्षर पटेल : डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने या मालिकेत देखील अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ३ सामन्यात १५.५० च्या सरासरीने ४ गडी बाद केले.
५) आर अश्विन : आर अश्विनने टी२० विश्वचषकातील चांगला फॉर्म न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही कायम ठेवला. आर अश्विनने आयसीसी टी२० विश्वचषक ३ सामन्यात ३ गडी बाद केले होते. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने फक्त ५.२५ च्या इकॉनॉमी रेटने धावा देत ३ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
फॅन मुमेंट! सेक्युरीटी गार्डला चकवा देऊन चाहत्याने थेट मैदानात केला प्रवेश अन् धरले मुस्तफिजूरचे पाय
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतरही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीची सतावतेय चिंता