---Advertisement---

भुवनेश्वर कुमारच्या जागी हैदराबाद संघात निवड झालेला कोण आहे पृथ्वी राज यारा, घ्या जाणून

---Advertisement---

सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२० च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी सनरायझर्स हैदराबाद संघाने २२ वर्षीय पृथ्वी राज याराची निवड केली आहे.

भुवनेश्वरला शुक्रवारी, २ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गोलंदाजी करताना १९ व्या षटकात दुखापत झाली होती. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळला नाही आणि आता संपूर्ण आयपीएल हंगामातूनच बाहेर पडला आहे.

त्याच्याऐवजी हैदराबाद संघात निवड झालेल्या पृथ्वी राज याराबद्दल थोडक्यात जाणून घेऊ –

पृथ्वी हा मध्यमगती गोलंदाज असून तो आंध्रप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. पण अजून त्याला देशांतर्गत क्रिकेटचा मोठा अनुभव नाही. त्याने २०१७ मध्ये तमिळनाडू विरुद्ध प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणातच त्याने ६ विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होते. त्याने त्या सामन्यात पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या होत्या. यात अभिनव मुकुंद, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन अशा क्रिकेटपटूंच्या विकेटचा समावेश होता.

याबरोबरच पृथ्वीने आंध्रप्रदेशच्या विविध वयोगटातील संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे. यात १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघांचा समावेश आहे. तसेच त्याचा भारत अ संघातही समावेश होता. पृथ्वी त्याच्या लाईन, लेंथ आणि गतीने प्रभावित करतो. तसेच त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे, जी त्याची मोठी ताकद आहे.

त्याने आत्तापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ९ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यात त्याने १५ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ३ टी२०चे सामने खेळले आहेत. यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

पृथ्वी आयपीएलमध्ये याआधी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्याने कोलकाताकडून मागीलवर्षी आयपीएलमध्ये हैदराबाद विरुद्ध पदार्पण केले होते. त्याचे पदार्पणही उत्तम झाले होते. त्याने पदार्पणातच जवळपास जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली होती, पण करियप्पाने बेअरस्टोचा झेल सोडला. त्यामुळे ही विकेट पृथ्वीला मिळाली नाही. पण नंतर पृथ्वीने हैदराबादचा धाकड सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले होते. यानंतर त्याला केवळ राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. पण यावेळी तो महागडा ठरला. त्याने २ षटकात २८ धावा दिल्या. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.

आता त्याची निवड यंदा हैदराबाद संघात झाली असून आता त्याला अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळणार का हे पाहावे लागेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---