आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील ३४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी पाहता, मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत, मुंबई इंडियन्स संघाकडून हा सामना हिसकावून घेतला. एकीकडे या मोठ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर केकेआरच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण आहे; तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनला मोठा फटका बसला आहे.
सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्यामुळे मॉर्नगला २४ लाखांचा दंड झाला आहे.आयपीएलने यासंबंधी माहिती देत लिहिले आहे की, “केकेआर संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनवर अबू धाबीच्या मैदानावर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या स्लो ओव्हरच्या नियमांनुसार, केकेआर संघ दुसऱ्यांदा ठरलेल्या वेळेत षटक पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. ज्यामुळे कर्णधार ओएन मॉर्गनवर २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.”
तसेच या विधानात असे देखील म्हटले गेले आहे की, “संघातील इतर खेळाडूंवर ६ लाख रुपये अर्थातच त्यांच्यावर त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड आकारला जाईल.”
यापूर्वी देखील केकेआर संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनवर षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड आकारण्यात आला होता. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात देखील केकेकआर संघाला निर्धारित वेळेत २० षटक पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे आयपीएल कमिटीने ओएन मॉर्गनवर १२ लाखांचा दंड ठोठावला होता.
ओएन मॉर्गनकडून आतापर्यंत दोन वेळेस ही चूक घडली आहे. त्यामुळे त्याच्यावर २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच तिसऱ्यांदा जर त्याच्याकडून ही चूक घडली; तर त्याला ३० लाख रुपये मोजावे लागतील. तसेच एका सामन्यात संघाबाहेर देखील राहावे लागू शकते.
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, केकेआर संघाने अवघ्या १५.१ षटकात हे आव्हान गाठले आणि ७ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-






