आयपीएल २०२६ मध्ये संघाना दुखापतीचे धक्के बसणे सुरूच आहे. चेन्नई सुपर किंग्जमधून वेगवान गोलंदाज खलील अहमद क्वाड्रिसेप्सला गंभीर दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. आता मुंबई इंडियन्सलाही (एमआय) एक धक्का बसला आहे. अथर्व अंकोलेकरला रणजी ट्रॉफीवेळी गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यातून तो सावरला नसून आता स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी २१ वर्षीय वेगवान गोलंदाजीला संधी दिली आहे.
मुळचा मुंबईचा असलेला अथर्व २०२० मध्ये भारताच्या अंडर-१९ चा भागही राहिला आहे. आता त्याच्या जागी क्रिश भगतला संधी दिली आहे. मुळचा पंजाबचा असलेला क्रिश अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो खालच्या फळीतील फलंदाज म्हणून फलंदाजीनेही योगदान देऊ शकतो. तो मागील दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. तो २०२६मध्ये डीवाय पाटील टी२० चषकात रिलायन्स संघाकडून खेळला होता. तसेच यावर्षी तो हंगामाआधीपासूनच एमआय संघाचा सहाय्यक गोलंदाज आहे.
क्रिशने कूचबिहार ट्रॉफीमध्ये ५०० पेक्षा अधिका धावा केल्या आहेत. तसेच त्याने कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये ३० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात प्रभावी कामगिरी केली असून त्याला मुख्य संघात निवडले आहे. त्याला मुंबईने ३० लाख रुपयाच्या मूळ किंमतीवर करारबद्ध केले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई कामगिरी निराशाजनक ठरली आहे. संघाने १४ वर्षांनंतर हंगामातील पहिला सामना जिंकला, मात्र त्यानंतर सलग तीन सामने गमावले आहेत. घरच्या मैदानावर खेळलेला शेवटचा सामनाही त्यांनी गमावला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धचा तो सामना मुंबईने १८ धावांनी गमावला होता.
मुंबई सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून या स्थितीत संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आजच्या (१६ एप्रिल) सामन्यात खेळणार की नाही हे अनिश्चित आहे. आज (१६ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई पंजाब किंग्जशी भिडणार आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबईने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील तीन सामने गमावले आहेत.
क्रिशचा एमआयसोबत करार झाला तोपर्यंतची त्याची देशांतर्गत कामगिरी-
प्रथम श्रेणी – ७ सामने, ७ विकेट्स आणि १४५ धावा
लिस्ट-ए – ९ सामने, ९ विकेट्स आणि एक अर्धशतक (५१ धावा विरुद्ध उत्तराखंड)
टी२० – ८ सामने, ८ विकेट्स (शेर ए पंजाब टी२० कप)





