गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो सामन्यात केवळ एकच ओव्हर टाकू शकला. आता चाहत्यांना प्रश्न पडलाय की, या वेगवान गोलंदाजाची दुखापत किती गंभीर आहे? तो लखनऊच्या आगामी सामन्यांमध्ये खेळू शकणार की नाही? यावर लखनऊचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानं मोठं अपडेट दिलं आहे.
क्रुणाल पांड्याच्या मते, मयंक यादव फिट आहे. म्हणजेच तो आगामी सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र क्रुणाल पांड्यानं सांगितलं की, त्याला याबाबत जास्त माहिती नाही. “मी मयंकशी बोललो. तो ठीक वाटतोय. ही आमच्यासाठी चांगली बातमी आहे”, असं क्रुणाल म्हणााला.
क्रुणाल पांड्या पुढे बोलताना म्हणाला की, “मयंक यादव मॅच्युअर खेळाडू आहे. मी त्याला गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो. तो गेल्या वर्षी देखील दुखापतग्रस्त झाला होता. मात्र तो परिपक्व खेळाडू आहे.” मयंक यादवचं फिट होणं केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्ससाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यानं या हंगामात आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. या युवा वेगवान गोलंदाजानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ताशी 156.7 किमी वेगानं चेंडू फेकला होता, जो आयपीएल 2024 चा सर्वात वेगवान चेंडू आहे.
मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये 6 बळी घेतले आहेत. तो हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. मयंकनं पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं. आयपीएल मधील पहिल्याच सामन्यात त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही त्यानं शानदार गोलंदाजी केली. या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. अशाप्रकारे आयपीएलच्या इतिहासात पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकवणारा मयंक पहिला खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज, जाणून घ्या कोण आहे विदर्भाचा यश ठाकूर?
एड शीरननं विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; शुबमन गिलनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!