आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याचे नाव अभिमानाने घेतले जाते. यॉर्कर चेंडूबद्दल चर्चा करताना तर मलिंगाचे नाव घेतल्याशिवाय ती चर्चा पूर्णच होत नाही. याच मलिंगाने 15 वर्षांपूर्वी अशी काही अविश्वसनीय कामगिरी केली होती, की साऱ्या क्रिकेट जगताला त्याने आपली दखल घेण्यास भाग पाडले होते.
आज(28 मार्च) बरोबर 15 वर्षांपूर्वी श्रीलंकेचा दिग्गज गोलंगाज लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याची अफलातून कामगिरी केली होती. त्याने ही कामगिरी 2007 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गयाना येथे केली होती.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 209 धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेला 210 धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेकडून तिलकरत्ने दिलशान(58) आणि रसल अरनॉल्ड(50) यांनी अर्धशतके केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून चार्ल लेंगेव्हल्डने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर दक्षिण आफ्रिका 210 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला. पण पहिल्याच षटकात एबी डिविलियर्स बाद झाला. मात्र यानंतर कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि जॅक कॅलिसने दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिका संघाला सावरले.
स्मिथ(59) बाद झाल्यावर कॅलिसला हर्षेल गिब्सने चांगली साथ दिली. पण गिब्स(31) बाद झाल्यावर मार्क बाऊचर आणि जस्टिन केम्प स्वतात बाद झाले. पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिका 5 बाद 182 अशा भक्कम स्थितीत होती. तसेच कॅलिस अजून खेळत होता. त्याने 44 व्या षटकापर्यंत 200 चा आकडा दक्षिण आफ्रिकेला पार करुन दिला होता.
त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका सहज जिंकेल असे वाटत होते. पण इथेच सामन्याला वळण मिळाले. 45 वे षटक टाकणाऱ्या मलिंगाने या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर शॉन पोलाक आणि अँड्र्यू हॉलला बाद केले. पोलाकला त्याने त्रिफळाचीत केले तर हॉलचा झेल उपल थरंगाने घेतला.
पण तरीही अजून कॅलिस नाबाद होता आणि 45 व्या षटकानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 4 धावांचीच गरज होती. 46 वे षटक चामिंडा वासने टाकले. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना केवळ 1 धाव दिली.
त्यामुळे पुन्हा 47 वे षटक टाकण्यासाठी मलिंगा आला. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 86 धावांवर खेळणाऱ्या जॅक कॅलिसची विकेट घेतली. कॅलिसचा झेल यष्टीरक्षक कुमार संगकाराने पकडला. त्यामुळे मलिंगा वनडे विश्वचषकात हॅट्रिक घेणारा त्यावेळी 5 वा गोलंदाज ठरला होता.
त्याने त्याच्या पुढच्याच चेंडूवर मखाया एन्टीनीलाही त्रिफळाचीत करत 4 चेंडूत 4 विकेट्स अशी अफलातून कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे श्रीलंका विजयाच्या जवळ पोहचली होती. परंतू नंतर रॉबिन पिटरसन आणि चार्ल लेंगेव्हल्ड यांनी विकेट पडू दिली नाही. त्यांनी मलिंगाचे उर्वरित षटक केवळ 1 धाव काढत खेळून काढले.
त्याच्या पुढचे वासने टाकलेले षटक निर्धाव गेले. त्यामुळे अजूनही दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 2 धावांची गरज होती. अखेर 49 व्या षटकात पिटरसनने मलिंगाला चौकार ठोकत दक्षिण आफ्रिकेला 1 विकेटने विजय मिळवून दिला. असे असले तरी या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार 4 चेंडूत 4 विकेट्स घेणाऱ्या मलिंगाला आणि लेंगेव्हल्ड या दोघांना देण्यात आला.
WICKET ✅
WICKET ✅
WICKET ✅
WICKET ✅#OnThisDay in 2007, Lasith Malinga took 4⃣ wickets in 4⃣ balls! 😱 pic.twitter.com/7TLcKZ4xhJ— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 28, 2019
पुढे मलिंगाने 2011 च्या विश्वचषकातही केनियाविरुद्ध कोलंबोला हॅट्रिक घेतली. त्याचवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने वनडेतील त्याची तिसरी हॅट्रिक साजरी केली.
🎩 vs South Africa (2007)
🎩 vs Kenya (2011)Happy birthday to the only man to take two World Cup hat-tricks, Lasith Malinga! pic.twitter.com/tvyK51Scbi
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) August 28, 2018
विशेष म्हणजे 2019 साली मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामना खेळतानाही 4 चेंडूत पुन्हा एकदा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याने त्या सामन्यात कॉलिन मुन्रो, हमिश रुदरफोर्ड, कॉलिन डी ग्रँडहोम आणि रॉस टेलरला सलग 4 चेंडूत बाद केले होते.
वाचा –
अन् कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला…
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५८ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…