आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मोठा फायदा झाला आहे. पंतनं पुन्हा एकदा टॉप-10 फलंदाजांमध्ये धडक मारली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने शानदार फलंदाजी केली होती, ज्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सततच्या खराब कामगिरीनंतर पंत टॉप 10 मधून बाहेर पडला होता. पण सिडनी कसोटीनंतर त्यानं पुनरागमन केलं आहे. पंतनं आता 9 व्या क्रमांकावर कब्जा केला. इतर भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं कोणत्याही भारतीय गोलंदाजाचं कसोटीमधील सर्वोत्तम रेटिंग मिळवलं. जसप्रीत बुमराह 908 रेटिंग गुणांसह जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे.
ताज्या आयसीसी क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झाला नाही. इंग्लंडचा जो रुट अव्वल स्थानावर कायम आहे. तर त्याच्याच देशाचा हॅरी ब्रूक 876 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची यशस्वी जस्वाल 847 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर तर भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धडाकेबाज खेळ करणारा ट्रॅव्हिस हेड 772 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने मोठी झेप घेतली. बावुमा 769 रेटिंगसह 6व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी तो 9व्या स्थानावर होता. हे त्याच्या कारकिर्दीचं सर्वोच्च रेटिंग आहे. श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस 759 च्या रेटिंगसह 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी स्टीव्ह स्मिथला बॉर्डर-गावस्कर मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे त्याला एका स्थानाचं नुकसान झालं. तो 146 गुणांसह 8व्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 725 च्या रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानची मोठी खेळी, पाकिस्तानातही ‘भारतीय फॉर्म्युला’ आजमावणार
अरे देवा! कुठून सुरुवात करू?…या दोन भारतीय खेळाडूंबद्दल हे काय म्हणाले ॲलन डोनाल्ड?