fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्या बात! ज्या क्रिकेट बोर्डाकडून खेळले त्याच बोर्डाचे अध्यक्ष झालेले ४ भारतीय क्रिकेटर

Listing the only 4 Indian players who became BCCI president

– किरण रासकर

१९२८ ला स्थापना झालेल्या बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषविणे ही अभिमानस्पद गोष्ट आहे. विशेषत: अशा देशात, जिथे क्रिकेट हा तमाम भारतीयांसाठी श्वास आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळण्यासाठी राजकीय वरदहस्त असणे नक्कीच गरजेचे असते. असे काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्यातील राजकीय कौशल्य व खेळाच्या जोरावर अनेक पदे भुषविली. अशाच काही खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

असे ४ शिलेदार आहेत, जे भारतीय संघाचे सदस्य होते जे पुढे जाऊन ते बीसीसीआयचे अध्यक्ष सुध्दा झाले.

१. विजयनगरचे महाराज कुमार

विजय आनंद गजपती राजू उर्फ ‘विझी’ (Vijay Ananda Gajapathi Raju) भारताचे नेतृत्व करणाऱ्या सर्वात वाईट कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. राजू यांनी १९५४ ते ५६ दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले. आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर भारतीय संघाचा सदस्य होण्याचा मार्ग खुला केला. १९३२ च्या इंग्लड दौऱ्यासाठी त्यांनी आर्थिक पाठबळ देऊ करून स्वत:ला उपकर्णधार म्हणून घोषित केले. तिथे जरी आरोग्याचे कारण देऊन त्यांनी संघातून माघार घेतली असली, तरी पुढील इंग्लंड दौऱ्यासाठी स्वत: कर्णधार म्हणुन पुन्हा संघात सामील झाले.

त्यांना विझी असेही म्हटले जात असे. विझी भारताकडून २७ जून १९३६ रोजी पहिला कसोटी सामना खेळले. या सामन्यातच ते संघाचे कर्णधारही राहिले आहेत. भारताचे पहिले कर्णधार सीके नायडु देखील महाराजा ऑफ विझींच्या नेतृत्त्वाखाली तीन कसोटी सामने खेळले. महाराजा ऑफ विझी हे कारकिर्दीत केवळ ३ कसोटी सामने खेळले व या तिनही सामन्यात ते भारताचे कर्णधार राहिले आहेत. पुढे ते बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले. तसेच ते लोकसभेचे खासदारही राहिले.

त्यांच्या श्रीमंतीचा फटका हा लाला अमरनाथ, सी. के. नायडू, सय्यद मुश्ताक अली आणि विजय मर्चंट यांनाही बसला. मॅंचेस्टर कसोटीमध्ये मर्चंट यांना धावबाद करण्यासाठी त्यांनी मुश्ताक अली यांच्याकडे गळ घातली होती. पण अली आणि मर्चंट यांनी २०३ धावांची विक्रमी सलामी भागीदारी दिली. बाका जलाणी यांना त्यांनी कसोटी संघात स्थान दिले. कारण काय तर जलाणी यांनी नाश्‍ता करतेवेळी नायडू यांची थट्टा केली होती. कहर म्हणजे ‘विझी’ हे प्रतिस्पर्धी गोलंदाजाला सामन्यानंतर सोन्याचे घडयाळ भेट म्हणुन देत. त्यांचा उद्देश एवढाच की गोलंदाजाने चेंडू फुल टॉस किंवा सोपा टाकावा.

तरीही ते बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी लाला अमरनाथ यांना भारतीय संघाचे कर्णधार बनविले. नायडू वयाच्या ६९ व्या वर्षी उत्तर प्रदेशकडून खेळणार होते. तेव्हा कानपुरच्या ग्रीकपार्क मैदानाला कसोटीचा दर्जा मिळवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.

त्यांनी ३ कसोटी सामन्यात ८.२५ सरासरीने केवळ ३३ धावा केल्या. तसेच त्यांनी प्रथम श्रेणी किकेटमध्ये ४७ सामन्यात ५ अर्थशतकांसह १८.६० च्या सरासरीने १२२८ धावा केल्या.

२. सुनील गावसकर

२०१४मध्ये आयपीएल प्रकरणांसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एन. श्रीनिवासन यांच्यावर आयपीएल २०१३ मधील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हा पदभार सोपविला होता.

आयपीएल २०१३ मध्ये झालेले भष्ट्राचाराचे आरोप तसेच एन. श्रीनिवासन यांची याबाबत चौकशी सुरू होती. ‘लिटल मास्टर’ म्हणून ओळख असणारे गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज विरूध्द पोर्ट ऑफ स्पेन येथे आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. भारताकडून १२५ कसोटी सामन्यात ५१.१२ च्या सरासरीने तब्बल १०१२२ धावांबरोबरच विक्रमी ३४ शतके त्यांच्या नावावर आहेत. तसे पाहिले तर त्यांना वनडे किकेटचा आनंद तितकासा घेता आला नाही. १०८ सामन्यात फक्त एक शतक. जमेची बाजू म्हणजे १९८३ च्या विश्‍वचषक संघात समावेश.

गावसकर हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोतम कसोटी सलामीवीर म्हणून गणले जातात. त्यांनी उत्तम संतुलन, पायाची हालचाल आणि तंत्रशुद्ध खेळी खेळण्याची कला अवगत होती. गावस्कर हे पहिले भारतीय किकेटर आहेत ज्यांनी १०००० धावांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजसारख्या संघासमोर २३६ धावांची खेळी त्यांनी केली. ज्यात त्यांनी मालकॉम मार्शल, अँन्डी रॉबर्ट, मायकल होल्डिंग आणि जॉल गार्नर यांसारख्या गोलंदाजांचा सामना केला. जिथे बाकी फलंदाज हेल्मेट घालूनही यांसमोर येण्यास घाबरत असायचे. तिथे ५ फूट ५ इंच असण्याऱ्या लिटल मास्टरने भेधडक फटकेबाजी केली. १९८७ मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी पाकिस्तान विरूध्द अखेरचा सामना खेळला होता.

३. शिवलाल यादव

जेव्हा शिवलाल यादव (Shivlal Yadav) हे निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनी मोहम्मद अझरुद्दीनची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली होती, हीच त्यांची खरी ओळख म्हणावी लागेल. हैद्राबाद किकेट असोशियनचे २००० ते २००९ अध्यक्ष आणि बीसीसीआयचे २०१३ उपाध्यक्ष पदही भूषविले. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्षपद हे वादग्रस्तच राहिले. कारण हैद्राबाद येथील नवीन क्रिकेट स्टेडीयम उभारनीत निधीच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले. २० अन्य अधिकाऱ्यांसोबत त्यांना हैद्राबाद न्यायालयच्या सुनावणीला सामोरे जावे लागले. यादव यांनी भारताकडून खेळताना ३५ कसोटी सामन्यात १०२ विकेट घेण्याचा कारनामा केला. तसेच ७ वनडे सामन्यात ८ विकेट्सही त्यांनी घेतल्या.

त्यांनी आपल्या आंतरराष्टीय कारकीर्दीची सुरवात १९७९ मध्ये बंगलोर येथे ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून केली. त्याच काळात इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन बिशन सिंग बेदी आणि बीएस चंद्रशेखर यांसारख्या दिग्गज फिरकी गोलंदाजांसोबत स्पर्धेत होते. यादव यांनी रवी शास्त्री व दिलीप दोशी यांना सोबत घेऊन गोलंदाजी त्रिकुट निर्माण केले. आपल्या पहिल्याच दौऱ्यात ऑस्ट्रेलिया सारख्या तगडया प्रतिस्पर्ध्यासमोर तीन कसोटी समन्यात १५ बळी घेतले. त्यांची सर्वोतम कामगिरी म्हणजे ११८ धावांच्या बदल्यात ८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन घेण्यास भाग पाडले. यादव हे चेंडू जास्त वळवत नसत, पण ते लगातार दीर्घकाळापर्यंत चिकाटीने गोलंदाजी करत.

शिवलाल यांनी १९८४मध्ये फैजलाबाद येथे पाकिस्तानविरूध्द एकाच डावात ७५ षटके टाकण्याची कामगिरी केली. त्या सामन्यात त्यांनी एकूण ९५ षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी केली. शिवलाल यांनी आपला शेवटचा कसोटी सामना १९८७ मध्ये पाकिस्तानविरूध्द बंगळुरूमध्ये खेळला होता.

४. सौरव गांगुली

सध्या नवनिर्वाचित असलेला बीसीसीायचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा बीसीसीआयचा पहिला अध्यक्ष आहे, जो बिनविरोध निवडून आला होता. मुंबईत बीसीसीआयच्या सर्व सदस्यांच्या अनौपचारिक बैठकीत हा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायलयाने नियुक्‍त केलेल्या प्रशासक समितीच्या (COA) नियमानुसार एकमताने निवड करण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार, गांगुलीला केवळ १० महिन्याचा कालावधी असेल. गांगुली उर्फ ‘दादा’ ने भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले.

भारताकडून खेळताना ११३ कसोटी सामन्यात ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या. गांगलीला ऑफसाईडचा बादशाह मानले जाते. आपल्या अचुक टायमिंगने दादाने वेगवान गोलंदाजावर वर्चस्व प्रस्थापित केले. फिरकीपटूंना पुढे येऊन चौकार षटकार मारून कायम दबावात ठेवत.

मर्यादित षटकांच्या प्रकारात ३११ वनडे सामन्यात ४१.०२ च्या सरासरीने ११३६३ धावा कुटल्या. २००० ते २००५ यादरम्यान भारतीय क्रिकेटसाठी कठीण कालखंडात संघाचे कर्णधार पदभुषविले. त्याने ४९ कसोटी सामन्यात नेतृत्व केले त्यात २१ विजय तर १३ सामन्यात पराभव अशी समाधानकारक कामगिरी केली. २००३ च्या विश्‍वचषकात भारताला उपविजेता पदापर्यंत घेऊन जाण्यात दादाचा खुप मोठा वाटा होता.

उत्तम नेतृत्वगुण, गुणवत्तापूर्ण खेळाडूंची पारख ही त्याची जमेची बाजू. जेव्हा भारतीय क्रिकेट संघाची प्रतिमा ही जगभरात मॅच फिक्सिंग घोटाळयामुळे डागाळली होती, तेव्हा गांगुलीने एखादया निर्भीड योध्यासारखे समोर येत नेतृत्व केले. पुन्हा भारतीय किकेटला उच्च स्थानावर घेऊन आला. याच गांगुलीने पुढे बंगाल क्रिकेट असोशियशनचे अध्यक्ष होताना अनेक चांगली कामे केली.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुली हा आयसीसीच्या पुढील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुढे दुसऱ्या टर्मसाठी ते इच्छुक नाहीत असे समजते. गांगुली या शर्यतीत आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष ग्रॅमी स्मिथने नुकतेच म्हटले आहे, की जर गांगुली आयसीसीचा अध्यक्ष झाला, तर आनंदच होईल. तसे झाल्यास भारतीय कर्णधारपद भुषवलेला व्यक्‍ती आयसीसी अध्यक्षपदी निवड होणे ही दुर्मिळ गोष्ट पहिल्यांदा दादाच्या रूपाने साध्य होईल.

वाचनीय लेख-

-गोष्ट त्या टीम इंडियाची, जिचे कर्णधार होतं असे राजे महाराजे

-क्रिकेटपटूंना स्वत: देखील आठवावे वाटणार नाहीत असे ७ लाजीरवाणे विक्रम

-टीम इंडियाकडून विश्वचषकात खेळलेले परंतु एकही कसोटी सामना नशिबात नसलेले ५ क्रिकेटर

You might also like