इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये संपुष्टात आणला. रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवून देणारे दोन खेळाडू आपले खाते देखील खोलू शकले नाहीत.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अनुभवी जेम्स अँडरसनने २१ धावात भारताचे पहिले तीन फलंदाज माघारी पाठवले. रहाणे व रोहित यांनी चौथ्या गड्यासाठी ३४ धावा जोडल्या. चहापानानंतर तर २२ धावात संघाचे सहा गडी बाद झाले.
लॉर्ड्स कसोटीचे हिरो ठरले झिरो
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारे मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह हे या सामन्यात साफ अपयशी ठरले. हे दोघेही गोल्डन डक म्हणजेच आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाले.
दोघांनी जिंकवली होती लॉर्ड्स कसोटी
लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) इंग्लंडचे पारडे जड होते. असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. परंतु रिषभ पंत आणि इशांत शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण सामन्याचे समीकरण बदलून टाकले.
दोघांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. मोहम्मद शमीने या डावात तुफानी अर्धशतक झळकावत नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने दुसरा डाव २९८ धावांवर घोषित केला. तसेच इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२० धावांवर गुंडाळत, संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा ‘जादुई गोलंदाज’ राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात! जागतिक टी-20 क्रमवारीत आहे अव्वलस्थानी
https://mahasports.in/engvsind-3rd-test-1st-day-live-2nd-session-england-7-overs-21-runs-0-out/