पुणे: भारतीय रोलबॉल महासंघ आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सलग दुस-या विजयाची नोंद केली. शनिवारी महाराष्ट्र संघाने दिल्लीवर मात केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीवर ८-०ने मात केली. महाराष्ट्र संघाकडून सिद्धी मोहोळने (१, ३, ५, ६ मि.) हॅटट्रिकसह चार गोल नोंदविले, तर लिलीयन अमन्ना (२ मि.), तन्वी यारगट्टीकर (५ मि.), अवनी जोशी (८ मि.) आणि मेहेक राऊत (१० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
इतर लढतींत गुजरातने केरळवर ३-२ने मात केली, तर उत्तर प्रदेशने मध्य प्रदेशवर ७-१ने विजय मिळवला. तमिळनाडूने झारखंडचा ९-०ने पराभव केला.
महाराष्ट्राच्या मुलांचा विजय
मुलांच्या गटात पहिल्या लढतीतील चुका सुधारून महाराष्ट्र संघाने झारखंडवर ९-२ असा विजय मिळवला. महाराष्ट्राकडून तनुज शर्माने (१ मि. ४६ से., १ मि. ३८ से., ४ मि. १४ से.) हॅटट्रिक नोंदवली, तर कर्णधार अमन राजा (०.०५ से., ४ मि. ४५ से.), यशराज पोरे (३ मि. १४ से., ५ मि. ४९ से.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
गौरव खाटकर (२ मि. ५५ से.) आणि अनिष (२ मि. २० से.) यांनी एक गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. झारखंडकडून दिब्यंम मंडल (२ मि.) आणि उज्ज्वल प्रतापसिंग (४ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. इतर लढतींत जम्मू-काश्मीर संघाने चंडिगड संघावर ५-२ने मात केली.
मध्यंतराला जम्मू-काश्मीर संघाकडे ३-१ अशी आघाडी होती. गुजरातने केरळ संघावर ६-१ने विजय मिळवला. मध्यंतराला गुजरातकडे २-१ अशी आघाडी होती.
उत्तरार्धात गुजरातच्या मुलांनी अधिक आक्रमक खेळ केला आणि केरळला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. हरियाणाने ओडिसाचा, तर तमिळनाडूने चंडिगडचा ९-०ने धुव्वा उडविला.
उत्तर प्रदेशने आंध्र प्रदेश १२-० असा दणदणीत विजय मिळवला. राजस्थान संघाने बिहारवर ७-०ने मात केली. मध्यंतराला राजस्थानकडे २-० आघाडी होती. तेलंगणाने पंजाबवर २-१ने, तर दिल्लीने पाँडिचेरीवर २-०ने मात केली.