जालनामध्ये रविवारी( 23 डिसेंबर) महाराष्ट्र केसरी 2018 ची अंतिम फेरी रंगली. या फेरीत बुलढाण्याच्या बाला रफीक शेखने गतविजेत्या अभिजित कटकेवर मात करत मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी मानाची चांदीची गदा पटकावली.
त्याच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी त्याचे कुटुंबही जालन्यात उपस्थित होते. त्याला महाराष्ट्र केसरी झालेला पाहुन त्याचे वडिल आझम शेख यांनाही डोळ्यातून आनंद अश्रू ओघळताना शब्द फुटत नव्हते.
6 फूट 3 इंच उंची असणारा पैलवान बाला रफीकला महाराष्ट्र केसरी झालेला बघताना त्याचे संपुर्ण कुटुंबच भावनिक झाले होते. त्याला या स्तरापर्यंत पोहचवताना अनेक खाचखळगे पार केलेल्या कुटुंंबाच्या कष्टांचे बाला रफीकने चीज केले होते आणि याचमुळे त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदअश्रू तरळत होते.
लाकूड तोडीचा व्यावसाय करत बाला रफीकच्या खूराकासाठी पैसे कमावणाऱ्या त्याच्या वडीलांना गगनात मावेनासा आनंद झाला होता. बालारफीकबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना त्याचे वडिल आझम शेख म्हणाले, ‘लाकडाच्या व्यवसायातून जे दोन पैसे येत होते. ते आम्ही बालाच्या खूराकासाठी तो कोल्हापूरला असताना पाठवले आहेत. त्यातून त्याची प्रगती होत गेली.’
बालामध्ये आणि बाकी भावंडामध्ये त्यांनी कधीही भेदभाव न करता सर्वांना सारखी शिकवण दिली. याबद्दल ते म्हणाले, ‘मी माझ्या घरात कधी भेदभाव केलेला नाही. जे मोठ्या मुलीला दिलं तेच सर्व बालालाही खायला मिळाले.’
आझम शेख हे देखील कुस्तीपटू होते. त्यांनी जवळजवळ 30 वर्षे कुस्ती खेळली आहे. बालारफीकने अनेकदा त्याच्या वडिलांबरोबर कुस्ती खेळली आहे. त्यांच्या कुस्तीबद्दल बोलताना आझम म्हणाले, ‘आमच्यावेळी बदाम तूप असं काही नव्हतं. साधं दुध, भाकरी, हुरडा खायचो. यावरच आमची कुस्ती होती.’
बाबांच्या कष्टाबरोबरच बाला रफीकसाठी त्याच्या आईनेही खूप कष्ट घेतले आहेत. ती कायम तो खूप मोठा मल्ल व्हावा यासाठी प्रार्थना करायची. याबद्दल सांगताना बाला रफीकची आई म्हणाली, ‘मी तो खूप मोठा व्हावा यासाठी प्रार्थना केली होती. त्याच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. त्याच्यासाठी दुध काढणे, म्हशी सांभाळणे असे सर्व केले आहे.’
घराण्यातच कुस्तीची परंपरा असलेल्या बाला रफीकचीही कारकिर्द कुस्तीत घडवायची असेच ठरवले होते, असेही त्याच्या आईने सांगितले.
बाला रफीक हा मोठा पैलवान व्हावा यासाठी फक्त त्याच्या आईवडिलांनी नव्हे तर त्याच्या भावानेही मोठा त्याग केला आहे, कष्ट केले आहे. बाला रफीक मोठा व्हावा म्हणून स्वत:च्या कुस्ती कारकिर्दीचाही त्याग त्याच्या भावाने केला आहे.
बालाबद्दल बोलताना त्याच्या भावालाही भरुन आले होते. त्याचा त्याग सार्थकी लागल्याची त्याची भावना त्यातून जाणवत होती. बाला रफीकबद्दल बोलताना भावनिक होत त्याचा भाऊ म्हणाला, ‘बालासाठी खूप काही केले आहे. त्याला तालमीत पाठवले. गरिब परिस्थित त्याच्यासाठी कामधंदा केला.’
ते पुढे म्हणाले, ‘बाला मोठा होत होता. त्यामुळे मी कुस्ती सोडली आणि त्याला तालमीत पाठवले.’
‘बाला दोन-चार महिन्यांनी एखाद्या दिवशी घरी येतो तेव्हा त्याची भेट होते. नाहीतर त्याला तालमीत जाऊनच भेटावे लागते.’
मुळचा सोलापूर जिल्हातील करमाळा येथील असणाऱ्या बालाच्या संपूर्ण कुटुंबाने अंतिम सामना पार पडण्याआधी तो महाराष्ट्र केसरी ठरेल असा विश्वास व्यक्त केला होता. बालानेही त्याच्या कुटुंबायांच्या विश्वास खरा ठरवताना त्यांनी त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे, केलेल्या त्यागाचे चीज केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–बालारफीक शेख- अभिजित कटके १० दिवसांत पुन्हा आमने-सामने? २८ डिसेंबरपासून पुण्यात हिंद केसरी स्पर्धा
–Maharashtra Kesari: बुलढाण्याचा बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी