भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम दिग्गज खेळाडूंच्या नावावर आहेत. मात्र, मानव सुथारने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच अशी कामगिरी केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत शानदार गोलंदाजी करत सुथारने 93 वर्षांपूर्वीचा एक विक्रम बरोबरीत आणला.
राजस्थानच्या या 24 वर्षीय फिरकीपटूने भारतासाठी आपल्या पहिल्या ‘होम’ कसोटीत आणि पहिल्या ‘ओव्हरसीज’ कसोटीत एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फिरकीपटू आणि एकूण दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
मानव सुथारने 6 जून 2026 रोजी मुल्लानपूर येथे अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात 6 बळी घेत त्याने शानदार सुरुवात केली.
त्यानंतर, श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळल्या गेलेल्या त्याच्या पहिल्या परदेशातील कसोटीत सुथारने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या फलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण केला.
गॉल कसोटीच्या पहिल्या डावात सुथारने 21.4 षटके गोलंदाजी केली, ज्यात 76 धावा देत 4 बळी घेतले. मात्र, दुसऱ्या डावात त्याने अधिक प्रभावी गोलंदाजी करत श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना बाद केले. अशा प्रकारे, सुथारने गॉल कसोटीत एकूण 10 बळी आपल्या नावावर केले.
या कामगिरीमुळे सुथारला एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळाले आहे. त्याच्या आधी, वेगवान गोलंदाज मोहम्मद निसारने 1932-33 च्या हंगामात ही कामगिरी केली होती.
25 जून 1932 रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या कसोटीत, निसारने पहिल्या डावात 93 धावांत 5 बळी घेतले होते. त्यानंतर, भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या आपल्या पहिल्या कसोटीतही त्याने इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा एका डावात 5 बळी घेण्याची कामगिरी केली. डिसेंबर 1933 मध्ये मुंबईत झालेल्या त्या सामन्याच्या पहिल्या डावात निसारने 90 धावा देत 5 बळी घेतले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात 5 बळी घेणारे मोहम्मद निसार हे पहिले गोलंदाज होते. त्यानंतर अनेक भारतीय गोलंदाजांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात (मग तो मायदेशातील असो वा परदेशातील) पाच बळी घेण्याची कामगिरी केली असली, तरी सुथारच्याआधी कोणत्याही गोलंदाजाला या दोन्ही प्रकारच्या मैदानांवर ही कामगिरी साधता आली नव्हती.
याव्यतिरिक्त, गाॅल कसोटीदरम्यान एका डावात 6 बळी घेऊन सुथारने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. श्रीलंकेच्या भूमीवर कसोटीच्या एका डावात 6 बळी घेणारा तो केवळ तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली होती.






