-आदित्य गुंड
डिसेंबर २००३. न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर होता. तोपर्यंत महिलांचे सामने टीव्हीवर दाखवले जाऊ लागले होते. त्यावेळी भारतातील महिला क्रिकेट बीसीसीआयच्या अखत्यारीत नव्हते. वूमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया (WCAI) नावाने कारभार चालत असे. भारताच्या माजी खेळाडू शांता रंगास्वामी या WCAI च्या अध्यक्ष तर शुभांगी कुलकर्णी सचिव म्हणून काम पाहत होत्या. भारतात महिला क्रिकेट वाढवायचे असेल तर त्या संघाचे अधिकाधिक सामने होणे, ते टीव्हीवर प्रक्षेपित होणे, महिला संघाला चांगले प्रायोजक असणे, त्यांना जाहिराती मिळणे या साऱ्या गोष्टी घडणे खूप गरजेचे आहे याची या दोघींना पुरेपूर जाणीव होती.
शुभांगी कुलकर्णी यांनी WCAI चा कारभार आपल्या हातात घेतला तेव्हा संस्थेकडे १५ लाख रुपये देणे होते. हे १५ लाख आपण कसे चुकते करणार? येणाऱ्या मालिकांसाठी पैसे कसे उभे राहणार? याची चिंता कुलकर्णी याना भेडसावत होती. याचवेळी एका अभिनेत्रीकडून अनपेक्षितपणे त्यांना मदत मिळाली. ती महिला कोण आणि तिने नक्की भारतीय महिला क्रिकेटला कशी मदत केली ते या लेखातून बघू.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होता. मैदानावर असलेल्या प्रेक्षकांचे लक्ष मात्र मैदानावर नसून एका स्टॅण्डकडे विशेषतः त्या स्टॅण्डमध्ये बसलेल्या एका महिलेकडे होते. ती अभिनेत्री असल्याने तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष असणे साहजिक होते. ही तीच होती जी पुढच्या महिन्याभरात भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठा बदल घडवून आणणार होती. सामन्यादरम्यान शुभांगी कुलकर्णी आणि तिची भेट झाली. एकमेकींचे नंबर दिले गेले. निघताना तिने कुलकर्णींना सांगितले, “माझ्याकडून काही मदत लागल्यास जरूर सांगा.”
न्यूझीलंडचा दौरा संपल्यावर साधारण महिनाभरातच वेस्ट इंडिजचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार होता. खरी गोची पुढे होती. मालिका तोंडावर आली तरी मालिकेसाठी प्रयोजक नव्हता. अशात शुभांगी कुलकर्णींना त्या अभिनेत्रीबरोबर झालेले बोलणे आठवले. त्यांनी लगेचच तिच्याशी संपर्क साधला. तिने कुलकर्णींना एक सल्ला दिला. WCAI कडून एक प्रस्ताव बनवून तो डायमंड ट्रेडिंग कार्पोरेशन म्हणजेच DTC ला देण्यास सांगितला. कुलकर्णी यांनी तो सल्ला मानला आणि त्याबरहुकूम काम केले. आणि काय आश्चर्य!! भारतीय महिला आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातल्या मालिकेचे नाव झाले ‘अस्मि वुमन्स क्रिकेट ट्रॉफी २००४’. ही किमया नक्की कशी घडली?
ती अभिनेत्री त्यावेळी अस्मिच्या जाहिरातीत झळकत होती. तिने अस्मिच्या जाहिरातीसाठी आणि मॉडेलिंगसाठीची फी पूर्णपणे माफ केली आणि त्याबदल्यात DTC ने भारतीय महिला क्रिकेटसाठी गुंतवणूक करावी अशी अट तिने घातली. ती अभिनेत्री होती मंदिरा बेदी.
My Favourite cricketer. Of all time @msdhoni ❣️🤟🏽 will be missed on the international stage. 😔 pic.twitter.com/rRhOeriCnf
— mandira bedi (@mandybedi) August 17, 2020
तीच मंदिरा बेदी जीला वर्षभर आधी झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकादरम्यान टिकेला सामोरे जावे लागले होते. ट्रोलिंग हा शब्द जेव्हा कदाचित अस्तित्वातही नसेल तेव्हा ती सबंध भारतात ट्रोल झाली होती. तिच्या वेशभूषेमुळे. क्रिकेट विश्वचषक ते महिलांची ही मालिका या दरम्यान तिची क्रिकेटची आवड चांगलीच वाढली होती. आता तर तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी एवढे मोठे योगदान दिले होते.
Sachin Tendulkar, Mandira Bedi at SMAASH Entertainment Launch, Photos: http://t.co/ufMu2Gr4 @mandybedi @sachin_rt pic.twitter.com/cIx5MyIy
— Filmicafe (@filmicafe) November 7, 2012
यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अनेक कार्यक्रमांना WCAI मंदिरा बेदीला आमंत्रित करीत असे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची ब्रँड अँबॅसिडर होती म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे तिने हे सगळं करण्यासाठी WCAI कडून एक नवा पैसाही आकाराला नव्हता.
Virat Kohli and Mandira Bedi pic.twitter.com/ICuJRLCzK4
— Crictoday (@crictoday) January 12, 2017
कालांतराने बीसीसीआयने WCAI ला आपल्या पंखांखाली घेतले. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटने मारलेली भरारी आपण सध्या पाहतोच आहोत. मात्र हेच महिला क्रिकेट इथपर्यंत आणण्यात मंदिरा बेदीचाही मोठा वाटा आहे हे अनेकांना सांगूनही खरे वाटणार नाही म्हणून हा लेखप्रपंच!!