कोरोना विषाणूच्या महामारीमुळे या वर्षी आयपीएलचे आयोजन यूएई येथे होणार आहे. खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात राहावं लागेल व नियमांचे पालन करावे. अशातच बीसीसीआयने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात काही माहिती दिली आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात मीडिया उपस्थित राहणार नाही. स्टेडियमच्या आत येण्यास मीडिया कर्मचार्यांना परवानगी दिली जाणार नाही.इतकेच नव्हे तर आयपीएलचा हा पहिला हंगाम असेल ज्यात सामन्यापूर्वी फ्रेंचायझीला पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि, सामन्यानंतर वर्चुअल पत्रकार परिषद घेणे अनिवार्य आहे.”
पुढे बोलतांना ते म्हणाले,“यावर्षीच्या परिस्थितीचा विचार करता युएईतील मीडिया वगळता कोणत्याही नवीन मीडियाची नोंदणी होणार नाही. याचा अर्थ असा की आयपीएल संदर्भातील अधिकृत अपडेट्ससाठी फक्त या देशातील मीडियालाच नोंदणी करता येणार आहे. बीसीसीआय या लीगबद्दल असलेली आतुरता समजते, म्हणून प्रत्येक सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.”
“सध्या बीसीसीआयकडे ज्या पत्रकारानीं नोंदणी केलेली आहे ते पत्रकार प्रत्येक सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर प्रत्रकारांसाठी असलेले निवेदन आणि नियमित अपडेट्स मिळवू शकतील. या निवेदनात सामन्यानंतर व्हर्चूअल पत्रकार परिषदेत सामील होण्याची प्रक्रिया आणि संघाच्या प्रतिनिधींना प्रश्न पाठविण्याविषयी माहिती असेल.” असेही पुढे बोलतांना अधिकाऱ्यांनी सांगितले.
“बीसीसीआय या मान्यताप्राप्त मीडियाला प्रत्येक सामन्यात 35 छायाचित्रेदेखील देणार आहेत आणि हे संपूर्ण स्पर्धेदरम्यान करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे छायाचित्रे आधिक आहेत. हे छायाचित्रे फक्त संपादकीय उद्देशानेच वापरायला हवेत आणि छायाचित्रे शेअर करताना त्यावर बीसीसीआय/ आयपीएल हे नाव असायला हवे” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्पर्धेचा उद्घाटन सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 20 सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुसरा सामना होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.