सध्या जगभरात ‘फुटबॉल फिवर’ चढलेला आहे. फुटबॉल विश्वचषकानंतर सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या युरो कप व कोपा अमेरिका या स्पर्धा अनुक्रमे युरोप व दक्षिण अमेरिका खंडांमध्ये सुरू आहेत. या सर्व धामधुमीत अनेक फुटबॉलपटू आपापले क्लब देखील बदलत आहेत किंवा करारमुक्त होत आहेत. फुटबॉल विश्वातील सध्याचा सर्वात मोठा खेळाडू मानला जाणारा अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याचे प्रसिद्ध स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना सोबतचा करार संपुष्टात आला असून, आता बार्सिलोना व मेस्सी पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे.
कागदोपत्री संपले मेस्सी-बार्सिलोना नाते
जवळपास वीस वर्षापासून अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हा बार्सिलोना संघाचे ला लीगामध्ये प्रतिनिधित्व करतो. ३४ वर्षीय मेस्सीने आपल्या युवा कारकीर्दीची सुरुवात बार्सिलोनापासून केली होती. त्यानंतर तो ३० जून २०२१ म्हणजे तब्बल ७५०४ दिवस या संघाचा सदस्य होता. परंतु, आगामी हंगामासाठी करारावर स्वाक्षरी न झाल्याने इतक्या दिवसांचे हे नाते कागदोपत्री संपुष्टात आले असून, मेस्सी आता इतर संघांसाठी देखील खेळू शकतो. मेस्सीने मागील वर्षी देखील क्लब सोडण्याचा विचार केला होता. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याचा करार कायम ठेवलेला.
…तर पुन्हा बार्सिलोनासाठी खेळू शकतो मेस्सी
स्पेनमधील वृत्तपत्रांच्या बातमीनुसार, बार्सिलोना फुटबॉल क्लबचे अध्यक्ष जोआन लापोर्तो यांनी मेस्सीसोबत करार पुढे वाढविण्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, यातून अखेरपर्यंत काही समाधान निघाले नाही. तरीदेखील, पुन्हा एकदा त्याच्याशी चर्चा करून त्याला करारबद्ध करण्यासाठी बार्सिलोना प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.
बार्सिलोनासोबत राहिली उज्वल कारकीर्द
जगातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या मेस्सीने तब्बल ७७८ सामन्यांमध्ये बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना ६७२ गोल झळकावले आहेत. तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये क्लबचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव खेळाडू आहे. सध्या तो कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचे नेतृत्व करत असून, त्याने चार सामन्यात तीन गोल मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
७५ कोटींची कार अन् करोडोंची घड्याळ! जाणून घ्या जगातील सर्वात महागडी लाईफस्टाईल जगणाऱ्या खेळाडूबद्दल