---Advertisement---

स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने सहाव्यांदा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावत रचला इतिहास

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 3:38 PM
---Advertisement---

पॅरिस। काल(2 डिसेंबर) फुटबाॅल जगतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार बॅलन डी’ओरचा वितरण सोहळा पॅरिसमध्ये पार पडला. यावर्षी हा पुरस्कार बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने पटकावला. मेस्सीने सहाव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

त्याने लिव्हरपूलचा बचावपटू व्हर्जिन व्हॅन डिजिकला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराच्या यादीत मेस्सी आणि व्हर्जिन व्हॅन डिजिकच्या पाठोपाठ ख्रिस्तियानो रोनाल्डो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

तसेच मेस्सी सर्वाधिकवेळा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने 5 वेळा हा पुरस्कार मिळवणाऱ्या रोनाल्डोला मागे टाकले आहे.

मेस्सीला यावर्षीचा बॅलन डी’ओर पुरस्कार लुका मोड्रिचने दिला. मोड्रिचने मागीलवर्षी हा पुरस्कार जिंकला होता.

हा पुरस्कार जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, “जेव्हा मला प्रथम हा सन्मान मिळाला त्याला 10 वर्षे झाली आहेत. त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि माझ्या तीन भावांबरोबर येथे आलो होतो. पुढील काही वर्षे अजून फुटबॉल खेळण्याची मला आशा आहे. मला माहित आहे की निवृत्तीचे वय जवळ आले आहे. म्हणूनच मी प्रत्येक क्षण जगत आहे.”

मेस्सीने चार वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने याआधी 2015मध्ये बॅलन डी’ओर मिळवला होता. मेस्सीला याआधी 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 यावर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे.

यावर्षी मेस्सी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 53 सामन्यांत 46 गोल केले आहेत. तसेच मेस्सी चॅम्पियन्स लीगमधील 34 संघांविरुद्ध गोल करणारा पहिला खेळाडूही आहे.

महिला फुटबॉलपटूंमध्ये अमेरिकाच्या मेगन रेपिनोने सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला.

मेगन रेपिनो म्हणाली, ‘हे माझ्यासाठी खूप चांगले वर्ष होते. मी माझ्या संघातील सहकारी, प्रशिक्षक आणि अमेरिकन फुटबॉल फेडरेशनचे आभार मानू इच्छित आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मी चांगले प्रदर्शन करु शकले.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---