fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

MI owner Mukesh Ambani whose private jet took Bravo from India to arrive in Jamaica for test series against Australia

एका संघमालकाने आपल्या संघातील खेळाडूच्या प्रवासासाठी थेट स्वत:चे वैयक्तित जेट प्लेन देणे हे ऐकणे अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरु शकते. अनेकांचा यावर विश्वासही बसणार नाही. पण असे झाले आहे आयपीएलमध्ये. ड्वेन ब्रावो हे कॅरेबियन बेटांबरोबरच भारतीय क्रिकेट वर्तुळात बरेच गाजलेले नाव आहे. ब्रावो म्हटलं की अनेक भारतीय चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीतील ब्रावो आठवतो. पण खूप कमी लोकांना माहित आहे की ब्रावो जसा चेन्नई सुपर किंग्ससाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला तसा तो मुंबई इंडियन्ससाठीही ठरला. हो, ब्रावो आयपीएलचे पहिले 3 मोसम मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि याच ब्रावोसाठी मुंबईचे सहसंघमालक मुकेश अंबानी यांनी तो जमैकाला परतण्यासाठी स्वत:चे जेट प्लेनची व्यवस्था केली होती.

झाले असे की पहिला आयपीएल मोसम सुरु असताना मेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर येणार होता. त्यावेळी मेमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार होती. त्यामुळे त्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात निवड झालेल्या खेळाडूंना आयपीएल सोडून जमैकाला परतावे लागणार होते. पण मुंबई इंडियन्सच्या आग्रहाखातर ब्रावो वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची परवानगी घेऊन एक आठवडा ज्यादाचा भारतात थांबला.

वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलियामधील मालिका 22 मे २००८पासून सुरु होणार होती. पण त्याआधी वेस्ट इंडिज खेळाडूंचा कॅम्प लागलेला होता. त्यामुळे सुरुवातीला ब्रावो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर 15 मेला जमैकाला रवाना होणार होता. पण पुढे 4 दिवसात मुंबई इंडियन्सचे 2 सामने होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या मालकांनी त्याला 18 मे पर्यंत थांबण्याची विनंती केली. कारण ब्रावो मुंबईसाठी महत्त्वाचा खेळाडू होता. त्याच्या उपस्थितीमुळे संघामध्येही उत्साह भरुन राहिला असता. ब्रावोनेही ही विनंती मान्य केली.

तो 16 मेला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. त्या सामन्यात त्याने 13 धावांत 2 विकेट्स घेतल्या. तर 18 मेला डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्याने 3 विकेट्स तर घेतल्याच तसेच 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर लगेचच ब्रावो अंबानींच्या जेट प्लेनमधून जमैकाला परत गेला. त्यानंतर तो 19 मेला वेस्ट इंडिज संघात सामीलही झाला होता.

निता अंबांनींना खास भेट दिले होते ते जेट प्लेन –

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक असून ऑक्टोबर 2007 मध्ये ते बिल गेट्स यांनाही मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. या आंनदाच्या काळात त्यांनी त्यांची पत्नी नीता अंबांनींना त्यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त 60 मिलियन यूएस डॉलर्स इतकी किंमत असलेले जेट प्लेन भेट म्हणून दिले होते. याच जेट प्लेनमध्ये ड्वेन ब्रावोने जमैकापर्यंत प्रवास केला होता.

पोलार्डला मुंबईत घ्या म्हणून ब्रावोनेच केली होती विनंती – 

आयपीएल म्हटले की आता कोणी वेस्ट इंडिज खेळाडूंशिवाय या स्पर्धेची कल्पनाही करु शकत नाही. त्यातही पोलार्ड, ब्रावो असे खेळाडू तर आयपीएलमध्ये खेळाबरोबरच मनोरंजनही करतात. गेल्या 10 वर्षापासून पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने प्रत्येकवेळी मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता तर पोलार्डशिवाय मुंबई इंडियन्सची कल्पनाही केली जात नाही. पण हाच पोलार्ड मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यामागे ब्रावोचा सर्वात मोठा वाटा आहे.

ब्रावोनेच मुंबई इंडियन्स मालकांना पोलार्डला संघात घ्या म्हणून पटवले होते. ब्रावो 2011 ला चेन्नई सुपर किंग्स संघात जाण्याआधी 3 वर्षे मुंबईकडून खेळत होता. जेव्हा 2009 च्या मोसमात मुंबई इंडियन्सला ब्रावोचा बदली खेळाडू संघात घेण्याची गरज होती तेव्हा ब्रावोने पोलार्डचे नाव सुचवले होते. पण पोलार्डचे अन्य एका संघाबरोबर करार सुरु असल्याने मुंबई इंडियन्सला त्याला संघात घेता आले नाही. त्यामुळे मग ब्रावोने ड्वेन स्मिथचे नाव सुचवले होते. त्यानंतर 2009 ला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यासाठी पोलार्ड भारतात आला होता. त्यावेळी तो त्रिनिदाद अँड टोबॅगो संघात होता. तेव्हा ब्रावो मुंबई इंडियन्स संघाबरोबर बोलला आणि त्याने त्यांना पोलार्डबरोबर करार करण्याचा सल्ला दिला. ब्रावो युवा पोलार्डची कामगिरी पाहून प्रभावित झाला होता.

ब्रावोच्या या सल्लानुसार मुंबई इंडियन्सचे मॅनेजर राहुल सांघवी आणि प्रशिक्षक रॉबिन सिंग हैद्राबादला पोलार्डबरोबर करार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी 19 वर्षीय पोलार्डबरोबर त्यांनी 2000 यूएस डॉलर्सचा करार केला होता.

याबद्दल क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत ब्रावोने सांगितले होते की ‘मी त्याच्यातील कौशल्य पाहिले होते. जेव्हा मुंबई इंडियन्सला माझ्या बदली खेळाडूची गरज होती तेव्हा मी त्यांना पोलार्डचे नाव सुचवले. जेव्हा त्यांनी पोलार्डशी संपर्क साधला तेव्हा तो एका क्लबसाठी खेळत होता. त्यामुळे मी ड्वेन स्मिथचे नाव सुचवले. ‘

‘त्यानंतर एक वर्षाने चॅम्पियन्स लीग हैद्राबादमध्ये होत होती. मी राहुलला संपर्क केला आणि सांगितले की पोलार्ड इथे आहे आणि त्याच्याबरोबर स्पर्धा सुरु होण्याआधी करार करा. तेव्हा राहुल आणि रॉबिन मुंबईवरुन आले आणि त्यांनी 2000 यूएस डॉलर्सचा करार केला. त्यावेळी मी पोलार्डला फोन करुन मला लॉबीमध्ये भेटण्यास सांगितले होते.’

‘त्रिनिदादमधून येणाऱ्या एका 19 वर्षांच्या मुलासाठी हा करार आश्चर्यकारक होता. त्यावेळी पोलार्डने मला म्हटले की हे खरेच आहे का. मी त्याला सांगितले की हो, हा करार कर. त्यानंतर पोलार्डसाठी ती स्पर्धा शानदार राहिली.’

पोलार्डने 2010 मध्येही आयपीएलमध्ये पदार्पण करताना शानदार कामगिरी केली. त्यानंतर पोलार्ड मुंबई इंडियन्सचा प्रमुख सदस्य झाला तर 2011 पासून ब्रावो चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग झाला. पण असे असले तरी या दोघांमधील मैत्री कायम आहे.

विशेष म्हणजे नीता अंबानी पोलार्डला मुंबई संघात आणण्यासाठी ब्रावोचे आभारही नेहमी मानत असतात.

ट्रेंडिंग लेख –

गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे ‘पाच’ टी२० ओपनर

ना रोहित, ना गेल ‘या’ ३ क्रिकेटपटूंनी ठोकले आहे क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार

You might also like