विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात समोरासमोर आले. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत श्रीलंकेचा डाव अवघ्या 43.3 षटकांमध्ये 209 धावांवर संपवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दोन बळी मिळवले. यासोबतच त्याने वनडे विश्वचषकात एक अविस्मरणीय कामगिरी करून दाखवली.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा नायक असलेल्या स्टार्क याने या सामन्यात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या दहा षटकांमध्ये 43 धावा दिल्या. त्याने या विश्वचषकात भारताविरुद्ध एक तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन बळी मिळवले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन बळी घेत त्याने या विश्वचषकातील आपल्या बळींची संख्या पाच पर्यंत नेली.
याबरोबरच स्टार्क हा सलग 21 विश्वचषक सामन्यांमध्ये बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 2015 मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळताना त्याने प्रत्येक सामन्यात बळी घेत 25 बळी मिळवत मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर 2019 विश्वचषकात त्याच्या नावे 24 बळी जमा होते. त्यानंतर आता देखील त्याने पाच बळी मिळवले आहेत.
स्टार्क याच्या नावे आता वनडे विश्वचषकात 54 बळी झाले असून, सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा 71 बळींसह पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याने 66, श्रीलंकेच्याच लसिथ मलिंगा याने 56 तर पाकिस्तानच्या वसीम अक्रम याने 55 बळी मिळवले आहेत.
(Mitchell Starc Took Wickets In 21 Consecutive ODI World Cup Matches)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा