भारतीय महिला संघ देखील सध्या पुरुष संघाप्रमाणेच इंग्लंड दौर्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळल्यानंतर रविवार (२७ जून) पासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. यातील पहिला वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकांत ८ बाद २०१ धावा केल्या. यात कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकाचे मोलाचे योगदान होते. या अर्धशतकासह एक खास विक्रम देखील यावेळी तिच्या नावे झाला.
विशेष कारनामा करणारी सगळ्यात वयस्कर खेळाडू
ब्रिस्टल येथे भारत विरूद्ध इंग्लंडच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र भारतीय संघ या डावात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने ५० षटकांत अवघ्या २०१ धावांवर त्यांना समाधान मानावे लागले. मात्र सगळे भारतीय फलंदाज अपयशी ठरत असतांना अनुभवी मिताली राजने जबाबदारीने खेळ करत अर्धशतक झळकवले. तिने १०८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाला किमान २०० धावांची वेस ओलांडता आली.
या अर्धशतकासह मिताली इंग्लंडमध्ये अर्धशतक झळकवणारी सगळ्यांत वयस्कर विदेशी महिला खेळाडू ठरली. तिने ३८ वर्ष २०६ दिवस हे वय असतांना हा कारनामा केला. यापूर्वी हा विक्रम अॅना ब्राऊनीच्या नावे होता. तिने ३८ वर्ष २६ दिवस हे वय असतांना इंग्लंडमध्ये अर्धशतक झळकवले होते.
इंग्लंडमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या वयस्कर विदेशी महिला क्रिकेटपटू –
१) मिताली राज – ३८ वर्ष २०६ दिवस – भारत, २०२१
२) अॅना ब्राऊनी – ३८ वर्ष २६ दिवस – वेस्ट इंडिज, १९९३
३) लिंडा ऑलिव्हर – ३५ वर्ष ६४ दिवस – दक्षिण आफ्रिका, २०००
४) अॅना गॉर्डन – ३४ वर्ष २२८ दिवस – ऑस्ट्रेलिया, १९७६
५) कॅरेन रॉल्टनफ्लॅग – ३४ वर्ष २२६ दिवस – ऑस्ट्रेलिया, २००९
भारतीय फलंदाजी ढेपाळली
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मिताली राज व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. मिताली राज शिवाय फक्त पूनम राऊतने ३२ धावा तर दीप्ती शर्माने ३० धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांच्यासह पदार्पण करणारी शेफाली वर्मा देखील अपयशी ठरली. परिणामी भारतीय संघाने इंग्लंडला केवळ २०२ धावांचे लक्ष्य दिले.
महत्त्वाच्या बातम्या:
तो एक झेल सोडणे भारतीय संघाला WTC फायनलमध्ये पडले महागात, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मत
‘हे’ होते १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात सभ्य आणि खोडकर खेळाडू, कर्णधाराने केला खुलासा