इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचे विजेतेपद पटकावल्यानंतर शनिवारी (२० नोव्हेंबर) विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सत्कार समारंभ चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर करण्यात आला. कर्णधार एमएस धोनीसह संघमालक एन श्रीनिवासन, बीसीसीआय सचिव जय शहा व चेन्नईचे हजारो चाहते या सोहळ्यास उपस्थित होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना चेन्नई संघ व कर्णधार धोनीचे गुणगान गायले.
काय म्हणाले स्टॅलिन?
या कार्यक्रमात चेन्नई संघाला शुभेच्छा देताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटले, “एन श्रीनिवासन यांनी मला मुख्यमंत्री म्हणून मला येथे बोलावले असते तरी, मी धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. माझे वडील करुणानिधीही धोनीचे चाहते होते. त्याचे राज्य झारखंड आहे पण तो आता तामिळनाडूच्या लाडक्या मुलासारखा आहे. तो नेहमी शांत असतो आणि कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे हे त्याला माहित असते.”
स्टॅलिन पुढे म्हणाले,
“तो एक उत्तम कर्णधार असून, संघाचे नेतृत्व करण्यात माहीर आहे. यावर्षीची आयपीएल जिंकल्याबद्दल मी त्याचे आणि चेन्नईच्या संपूर्ण फ्रँचायझीचे याद्वारे अभिनंदन करतो. धोनीला आणखी अनेक हंगाम सीएसकेकडून खेळताना पाहण्याची आमची इच्छा आहे.”
स्टॅलिन यांना यापूर्वीही अनेकदा चेन्नईमध्ये सीएसकेच्या सामन्यांना हजेरी लावताना पाहिले गेले आहे.
चेन्नईने जिंकले चौथे विजेतेपद
मागील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नईने आपले चौथे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स चा पराभव करत त्यांनी हे विजेतेपद आपल्या नावे केलेले. या विजयानंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, धोनीने आपण आपला अखेरचा सामना चेन्नईत खेळणार असल्याचे जाहीर करत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला