गेल्या २ वर्षांत अनेक क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकलेले दिसले आहेत. आता इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सनेही एक खूशखबर दिली आहे. त्याने त्याची बराच काळापासूनची प्रेयसी सारा कँटले हिच्याबरोबर साखरपुडा केला आहे. त्याने शनिवारी (२० नोव्हेंबर) याबद्दल माहिती दिली.
३० वर्षीय सॅम बिलिंग्सने मालदीवमध्ये साराबरोबर साखरपुडा केला. त्याने दोघांचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवकर तू ‘मिसेस बी’ होणार! मी या जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे.’ बिलिंग्सने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये साराने त्यांच्या साखरपुड्याची अंगठी घातलेली दिसत आहे.
बिलिंग्सच्या या पोस्टवर क्रिकेटजगतातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यात मार्क वूड, टीम सिफर्ट, पीटर सिडल, बेन कटिंग, पॅट कमिन्स अशा खेळाडूंचा समावेश आहे. सर्वांनी बिलिंग्सला त्याच्या आयुष्यातील या नव्या वळणाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
बिलिंग्स हा इंग्लंड संघात यष्टीरक्षक फलंदाजाची भूमीका निभावतो. नुकताच तो टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत इंग्लंडकडून खेळताना दिसला होता. त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. तोही न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेचा उपांत्य सामना होता. या सामन्यात इंग्लंड संघ पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर झाला होता.
याशिवाय बिलिंग्सची होणारी पत्नी सारा ही इंग्लंडमध्येच मोठी झालेली असून टेनिसपटू आहे. तिने अनेक विजेतीपदं जिंकले आहेत. तसेच तिने मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
बिलिंग्सने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत २५ वनडे आणि ३३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ३३.७२ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १६.६८ च्या सरासरीने ४१७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर वनडेत १ शतक आणि ४ अर्धशतके आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने २ अर्धशतकं केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘देऊन टाक तुझा अवॉर्ड केएल राहुलला’, असं हर्षल पटेलला युजवेंद्र चहल का म्हणाला? पाहा व्हिडिओ
“मला घरी बोलावून असा बर्गर खायला दिला” आर अश्विनचे कौतुक करत वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मिम
धोनीला चेन्नईत खेळता येणार अखेरचा टी२० सामना? जय शाह यांनी केले मोठे भाष्य