पाकिस्तान संघ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आणि त्यांच्या एका माजी खेळाडूने भारतही उपांत्य फेरीत पोहोचणार नाही अशी भविष्यवाणी केली होती. आता तो तोंडघशी पडला आहे, कारण भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्याबरोबरच त्याला यूएसएविरुद्धच्या पराभवाचीही आठवणही करून दिली.
कैफचे म्हणणे आहे की चर्चेत राहण्यासाठी काही लोक अशी भविष्यवाणी करत असतात. त्याने त्याच्या युट्युब चॅनलवर म्हटले, “आमिरला खरोखर माहित नव्हते का की भारत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही? त्याला चांगलेच माहित होते की गतविजेते पुढे जातील. बातम्या निर्माण करण्यासाठी अशी विधाने केली जातात. आपण त्यांना इतके महत्त्व देऊ नये. त्यांच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.”
यावेळी कैफने यूएसएविरुद्ध झालेला पाकिस्तानचा पराभव याचीही आठवण करून दिली. टी२० विश्वचषक २०२४च्या त्या सामन्यात सुपर ओव्हर आमीरनेच टाकली होती. यावरून कैफ म्हणाला, “यूएसएविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये दबावात येऊन चेंडू स्टम्पवर न टाकणे, हे कसे प्रदर्शन? अधिक काही बोलणार नाही, मात्र सगळ्यांनी पाहिले काय झाले होते ते.”
यूएसएविरुद्ध आमीरने ती सुपर ओव्हर टाकली होती. त्यामध्ये त्याने ४, २, १, २ वाईड, १, २ वाई़ड, २, ३ वाईड, १ धावबाद विकेट अशी ओव्हर टाकली होती. तो सामना यूएसएने ५ धावांनी जिंकला होता.
“आपण त्याची चर्चा काय करतो. एक असा देश जो खेळामध्ये खूप मागे आहे, त्यांच्याकडे कोणतेही खेळाडू नाही, त्यांच्याकडे उत्तम कर्णधार आणि गोलंदाज नाहीत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता नाही. आपण त्यांच्यावर बोलावे हेच त्यांना हवे आहे,” असेही कैफने पुढे म्हटले आहे.






