ऑस्ट्रेलिया दौर्यावरील भारतीय संघाने आत्तापर्यंत संमिश्र यश मिळविले आहे. वनडे मालिका भारताने १-२ अशी गमावली होती. परंतु टी-२० मालिकेत पुनरागमन करत २-१ अशा फरकाने भारतीय संघाने विजय मिळविला.
मात्र या दौऱ्यात संघाचे क्षेत्ररक्षण हा एक चिंतेचा विषय ठरला आहे. संघातील सगळ्याच खेळाडूंनी सोपे झेल सोडले तर धावा अडविण्यात देखील विशेष योगदान कुठलाच क्षेत्ररक्षक देऊ शकला नाही. याच कारणामुळे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने भारतीय संघ अशा क्षेत्ररक्षणाने टी-२० विश्वचषकातील महत्वाच्या सामन्यांमधे पराभूत होईल, अशी भविष्यवाणी केली आहे.
विश्वचषकात चुकवावी लागेल मोठी किंमत
भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना कैफ म्हणाला, संघाने जर अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणात बदल केला नाही, तर येत्या टी-२० विश्वचषकात भारताला मोठी किंमत मोजावी लागेल. महत्त्वाच्या सामन्यांत एक-दोन चुका देखील सामन्याचं रूप पालटवू शकतात. इतके सारे झेल सोडणं, हे कधीच माफ केल्या जाऊ शकत नाही. भारताला या विभागात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.”
मोहम्मद कैफ भारताचा सार्वकालीन महान क्षेत्ररक्षक
मोहम्मद कैफ हा क्रिकेटमधील सार्वकालीन सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. आपल्या काळातील अनुभव सांगताना कैफ म्हणाला, “सध्या संघात अनेक नवीन गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर झेल सुटल्यावर ते काहीही न म्हणता पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. मात्र आमच्या काळी अजित आगरकर, झहीर खान, जवागल श्रीनाथ यांच्या गोलंदाजीवर आम्ही झेल सोडला असता आमच्याकडे ते प्रचंड रागाने बघत असत. त्यांच्या त्या रागामुळे आम्ही क्षेत्ररक्षणाचा अधिक सराव करण्यासाठी प्रवृत्त व्हायचो. जेव्हा वरिष्ठ खेळाडू गोलंदाजी करत असतात आणि आपण झेल सोडतो, तेव्हा त्यांनी काहीही म्हंटले नाही तरी आपल्याला आपली चूक लक्षात येत असते.”
संबधित बातम्या:
– इथेच माशी शिंकली! तिसऱ्या टी२०त भारताला मिळालेल्या पराभवाची ५ कारणे
– आश्चर्यकारक! भारत-ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या टी२० सामन्यात बनले एकूण ९ मोठे विक्रम, पाहा संपूर्ण यादी
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती