अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. मात्र या सामन्यात बेंगलोरचा पराभव होण्याबरोबरच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकीपटू वनिंदू हसरंगा यांच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.
या सामन्यात बेंगलोरने राजस्थानसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच बेंगलोरच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, राजस्थानकडून मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) या सामन्यात टाकलेल्या २ षटकांत ३ षटकार मारण्यात आले, तसेच वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) त्याच्या पहिल्या ३ षटकांत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, चौथ्या षटकात जोस बटलरने त्याला २ षटकार मारले.
त्यामुळे सिराज आणि हसरंगा यांच्याविरुद्ध आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) फलंदाजांनी मारलेल्या षटकारांचा आकडा ३० पार झाला आहे. सिराजने या संपूर्ण हंगामात एकूण ३१ षटकार दिले, तर हसरंगाने ३० षटकार दिले. त्यामुळे एका आयपीएल हंगामात आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज अव्वल क्रमांकावर, तर हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी हा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर होता. त्याने २०१८ साली २९ षटकार दिले होते (Most 6s conceded in an IPL season).
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार देणारे गोलंदाज
३१ षटकार – मोहम्मद सिराज, २०२२
३० षटकार – वनिंदू हसरंगा, २०२२
२९ षटकार – ड्वेन ब्रावो, २०१८
२८ षटकार – युजवेंद्र चहल, २०१५
२७ षटकार – युजवेंद्र चहल, २०२२
राजस्थानची अंतिम सामन्यात धडक
बेंगलोरने या सामन्यात (Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore) प्रथम फलंदाजी करताना रजत पाटीदारच्या ५८ धावांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या आणि राजस्थानला १५८ धावांचे आव्हान दिले. राजस्थानकडून गोलंदाजीत ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद १०६ धावा करताना राजस्थानला १९ व्या षटकातच विजय मिळवून दिला. या विजयाबरोबर २००८ नंतर राजस्थानने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
यंदाची फायनल RR vs GT संघात, पण आतापर्यंत कुणी खेळला आयपीएलचा अंतिम सामना? घ्या जाणून
जोस पुन्हा राहिला राजस्थानच्या विजयाचा बॉस..! झंझावाती शतक ठोकत रचले विक्रमांचे मनोरे